बुमराच्या जागी नबीला प्रथमच भारताच्या कसोटी संघात स्थान 
क्रीडा

बुमराच्या जागी नबीला प्रथमच भारताच्या कसोटी संघात स्थान

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यातून भारतीय कसोटी संघात निवड होणारा २९ वर्षांचा नबी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डाव्या पायाच्या गुडघ्याला झालेली दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने बुमरा या दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नबीची निवड केली आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाला प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होत आहे.

नबीच्या आधी परवेझ रसूल आणि उमरान मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटीत आजवर असे घडलेले नाही. त्यामुळेच काश्मीरमधील बारामुल्ला येथील एका दुर्गम गावातील रहिवासी असलेला नबी इतिहास रचू शकतो. त्याने रणजी ट्रॉफीच्या गेल्या दोन हंगामांत मिळून १०४ बळी टिपले आहेत, ज्यामध्ये २०२५-२६ च्या हंगामातील ६० बळींचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरला पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो उपयुक्त फलंदाजही आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात भारत-अ संघाकडून खेळताना त्याने चमक दाखवली होती.

३२ वर्षीय बुमराच्या गुडघ्याची सुज गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. आगामी व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या क्रीडा विज्ञान चमूने अनुभवी गोलंदाजाला घाईघाईत मैदानात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यालाही बुमरा मुकला होता.

भारताचा सुधारित संघ

शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन (तंदुरुस्तीच्या आधारे), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुर्नूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी