भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत महिला खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन संरचना तयार करणे आणि देशांतर्गत पातळीवर त्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळवून देणे.
महिला क्रिकेटपटूंचे मानधन दुप्पट
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन वेतन रचनेनुसार महिला क्रिकेटपटूंच्या सामन्यांच्या मानधनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ सध्याच्या तुलनेत २.५ पट असल्याचे सांगितले जात आहे.
वरिष्ठ महिला एकदिवसीय आणि बहु-दिवसीय स्पर्धा
प्लेइंग इलेव्हन: ५०,००० रुपये प्रतिदिन
राखीव खेळाडू: २५,००० रुपये प्रतिदिन
राष्ट्रीय महिला टी-२० स्पर्धा
प्लेइंग इलेव्हन: २५,००० रुपये प्रतिदिन
राखीव खेळाडू: १२,५०० रुपये प्रतिदिन
ज्युनियर महिला खेळाडूंनाही होणार फायदा
२३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील महिला खेळाडूंच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.
ज्युनियर महिला स्पर्धा
प्लेइंग इलेव्हनः २५,००० रुपये प्रतिदिन
राखीव खेळाडूः १२,५०० रुपये प्रतिदिन
पंच आणि सामनाधिकाऱ्यांचीही चांदी
महिला वरिष्ठ खेळाडू आणि ज्युनियर खेळाडू यांच्यासह पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या मानधनातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आता, देशांतर्गत लीग सामन्यासाठी पंचांना प्रतिदिन ४०,००० रुपये मिळणार आहेत. तसेच, नॉकआउट सामन्यांसाठी ही रक्कम वाढवून ५०,०००ते ६०,००० रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. यामुळे रणजी ट्ऱॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पंचाना प्रति सामना सुमारे १.६० लाख रुपये मिळतील. तर, नॉकआउट सामन्यांमध्ये त्यांना २.५ ते ३ लाख रुपये मिळतील.
पूर्वीची वेतन रचना
जुन्या वेतन रचनेनुसार, वरिष्ठ महिला स्पर्धांमध्ये प्लेइंग-११ मधील खेळाडूंना दिवसाला २०,००० रुपये तर राखीव खेळाडूंना १०,००० रुपये मिळत होते. ज्युनियर संघातील खेळाडूंना १०,००० रुपये आणि ५,००० रुपये दिले् जात होते. टी–२० स्पर्धांमध्ये हे मानधन आणखी कमी होते. त्यामुळे एखादी वरिष्ठ महिला क्रिकेटपटू संपूर्ण हंगामात फक्त लीगमधील सामने खेळली तरी तिला जास्तीत जास्त २ लाख रुपयेच मिळत होते. परंतु, बीसीसीआयच्या या नवीन निर्णयामुळे महिला क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.
बीसीसीआयचे मोठे पाऊल
बीसीसीआयचा असा विश्वास आहे की, या सुधारित वेतन रचनेमुळे महिला क्रिकेटपटू आणि देशांतर्गत सामना अधिकाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे देशातील देशांतर्गत क्रिकेट रचना आणखी मजबूत होईल.