मुंबई : लहानपणापासूनच आव्हानांचा सामना करणे मला आवडले आहे. मुंबई क्रिकेटमध्ये मोठी स्पर्धा असल्याने येथे प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागते. त्यामुळे आता देशाच्या टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची नवी जबाबदारी मिळाली असली, तरी यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात किंवा स्वभावात कोणताही बदल होणार नाही, असे मत भारताचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले.
३१ वर्षीय श्रेयसची शनिवारी भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याने सूर्यकुमार यादवची जागा घेतली असून सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने मार्च महिन्यात टी-२० विश्वचषक जिंकला होता. मात्र श्रेयसकडे भविष्याचा विचार करता नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मुंबईतील क्रिकेटच्या आव्हानात्मक वातावरणात वाढलेला तोच व्यक्ती म्हणून मला पुढे जायचे आहे, असे अय्यरने मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
“एखादी जबाबदारी खांद्यावर आली, म्हणून आपले व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज नाही. आपण पूर्वी जसे होतो तसेच राहू, कोणाच्या छायेत राहण्याचा किंवा इतर कोणासारखे बनण्याचा प्रयत्न करणार नाही,” असे श्रेयस म्हणाला. “मुंबईत क्रिकेटचे महत्त्व मोठे असून तेथील स्पर्धा खूप तीव्र असते आणि गल्लीबोळातील प्रत्येक मुलाला मुंबईचे प्रतिनिधित्व करायचे असते, त्यामुळे मुंबईत लहानाचा मोठा होताना आपल्याला आव्हाने नेहमीच आवडली,” असेही श्रेयसने नमूद केले.
कर्णधारपदाची ही नवी जबाबदारी माझ्यासाठी एक उत्तम आव्हान असल्याचेही श्रेयसने सांगितले. भारतीय संघ जून-जुलै महिन्यात आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून त्या मालिकांद्वारे श्रेयस आपल्या नेतृत्वपर्वाचा प्रारंभ करणार आहे.
एकूणच श्रेयसकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल्यामुळे सध्या क्रीडाविश्वात एकच चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मते सूर्यकुमारला किमान एखादी मालिका संधी द्यायला हवी होती. तर अनेकांनी निवड समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. श्रेयसच्या नेतृत्वात २०२४मध्ये मुंबईने मुश्ताक अली स्पर्धा जिंकली, तसेच आयपीएलमध्ये कोलकाता संघानेही २०२४मध्ये श्रेयसच्याच नेतृत्वात जेतेपद मिळवले होते. तर २०२५मध्ये श्रेयसने पंजाबला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. आता तो भारताचा कर्णधार म्हणून छाप पाडण्यास उत्सुक असेल.
श्रेयस कर्णधारपदाचा हकदार : गांगुली
श्रेयसने चांगली कामगिरी केली असून त्याने हे पद मिळवून दाखवले आहे. सूर्यकुमारला पदावरून हटवणे अन्यायकारक आहे असे मी म्हणणार नाही, कारण निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. डिसेंबर २०२३ मध्ये ५१वा टी-२० सामना खेळल्यानंतर श्रेयसने संघातील स्थान गमावले होते. उजव्या हाताने फलंदाजी करणारा श्रेयस मध्यक्रमात सूर्यकुमारचा पर्याय म्हणून संघात आला आहे. गांगुलीने श्रेयसच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना २०१९-२०मध्ये आयपीएलमध्ये श्रेयससह दिल्ली संघासाठी काम करताना मजा आल्याचेही गांगुलीने सांगितले. त्यावेळी श्रेयस दिल्लीचा कर्णधार होता, तर गांगुली प्रशिक्षकपद भूषवत होता.
क्रिकेट प्रशिक्षणाला आता एआयची जोड
एआय संचालित जागतिक क्रीडा प्लॅटफॉर्म कबुनीने मुंबई येथे आयोजित आपल्या पहिल्या कार्यक्रमात अधिकृतपणे पदार्पण केले आहे. क्रीडा, तंत्रज्ञान आणि खेळ यांच्या संगमावर उभ्या असलेल्या कबुनीने प्रशिक्षणासाठी जगातील पहिल्यांदाच वापरल्या जाणाऱ्या अभिनव दृष्टिकोनाची ओळख करून दिली आहे. प्रगत एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे प्लॅटफॉर्म रिअल-टाइम आणि वैयक्तिकृत प्रशिक्षण प्रदान करते, ज्यामुळे सर्व स्तरांवरील खेळाडूंना कधीही आणि कुठेही आपल्या कामगिरीत सुधारणा करता येते. यामध्ये दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.