बंगळुरू : बंगळुरू चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) जबाबदार आहे, असा ठपका केंद्रीय प्रशासकीय लवादाने ठेवला व निलंबित आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) आरसीबी संघावर निशाणा साधला. त्यांनी आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच यासाठी त्यांना आठवडाभराची मुदत दिली आहे.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने ३ जून रोजी आयपीएलचे जेतेपद मिळवले. १८ वर्षांत प्रथमच ही स्पर्धा जिंकल्याने ४ जून रोजी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर विजयी मिरवणूक काढण्यात आली. मात्र यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ७५ जण जखमी झाले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी व अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांना निलंबित करण्यात आले होते.
लवादाने सांगितले की, “पोलीस देव किंवा जादूगार नाही. पोलिसांना सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. त्यामुळे मोठा जमाव नियंत्रित करण्याची आशा त्यांच्याकडून बाळगता येणार नाही. ‘आरसीबी’ने विजयी परेड काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही. त्यांनी अचानक सोशल मीडियावरून विजयी परेडची घोषणा केली. त्यामुळे ५ लाख लोकांची गर्दी जमण्यासाठी ‘आरसीबी’ जबाबदार आहे, असा ठपका लवादाने ठेवला.
आरसीबी संघाच्या निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. त्यामुळे काही नागरिकांना नाहक प्राण गमवावे लागले, असे लवादाचे म्हणणे आहे. तेव्हापासून बंगळुरू संघाच्या ट्विटर खात्यावर एकही पोस्ट टाकण्यात आलेली नाही. तसेच विराट कोहलीनेही एकही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे चाहते आणखी टीका करत आहेत.