सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच लढतींच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सिडनीत सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचे भारताचे लक्ष्य असेल. मात्र या लढतीपेक्षा सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती भारतीय संघातील अंतर्गत वादाची. सातत्याने सुमार कामगिरी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मालाच संघातून वगळण्याचे संकेत प्रशिक्षक गौतम गंभीरने दिले आहेत. त्यामुळे रोहितची कसोटी कारकीर्द संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत ही मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. मग दुसऱ्या लढतीत गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली व ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना १० गडी राखून नेस्तनाबूत केले. त्यानंतर पर्थ येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. या लढतीत पावसाने खेळखंडोबा केला. मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत अखेरच्या दिवसापर्यंत झुंज देऊनही भारताच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे कांगारूंनी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून १० वर्षांनी प्रथमच भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची उत्तम संधी त्यांच्याकडे आहे. भारताला मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्यासाठी ही लढत जिंकण्यासह अन्य संघांच्या कामगिरीवर विसंबून रहावे लागणार आहे. तूर्तास गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या, तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, गुरुवारी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने अनेक प्रश्नांवर दिलेल्या उत्तरांद्वारे रोहित पाचव्या कसोटीस मुकण्याची शक्यताच अधिक आहे. विश्रांतीच्या नावाखाली ३७ वर्षीय रोहितला डच्चू देण्यात येणार आहे. एका पत्रकाराने गंभीरला रोहित पाचव्या कसोटीत खेळणार का, असे विचारले असता त्याने शुक्रवारी सकाळी खेळपट्टी पाहून अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे रोहितऐवजी तारांकित वेगवान गोलंदाज बुमरा संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तसेच २ दिवसांपूर्वीच चौथ्या कसोटीनंतर ड्रेसिंग रूममध्ये संघातील वरिष्ठ खेळाडू व गंभीर यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे रोहित व गंभीर यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे दिसते. यामागे रोहितची फलंदाज म्हणून कामगिरी तसेच त्याची नेतृत्वशैलीही कारणीभूत आहे.
रोहितने या मालिकेतील ३ कसोटींमध्ये फक्त ३१ धावा केल्या आहेत. मुख्य म्हणजे त्याला एकाही डावात १० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. न्यूझीलंडविरुद्धही मायदेशात रोहितची सुमार कामगिरी सुरू होती. ती मालिका भारताने ०-३ अशा गमावली. मधल्या फळीत अपयशी ठरल्यावर सलामीलाही त्याला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे फक्त कर्णधार असल्याने रोहित संघातील स्थान अडवून धरत आहे, अशी प्रतिक्रिया काही चाहत्यांनी व्यक्त केली. “रोहितचे पाय फलंदाजीच्या वेळेस फारसे हालताना दिसत नाही, त्यामुळे तो कसोटीतून निवृत्ती पत्करू शकतो,” असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील म्हणाले होते. अशा स्थितीत मेलबर्नला झालेली कसोटी रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची ठरली का, हाच प्रश्न सर्व क्रीडाप्रेमी विचारत आहेत. कारण सिडनीनंतर भारतीय संघ जून महिन्यापर्यंत एकही कसोटी सामना खेळणार नाही.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने या कसोटीसाठी एकमेव बदल केला आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर कांगारूंनी झोकात पुनरागमन केले. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना सूर गवसला असून आता गोलंदाजी विभागही पूर्ण लयीत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा कडवी झुंज मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता ही लढत सुरू होणार असल्याने ऐन थंडीत पुन्हा एकदा दर्दी क्रिकेटप्रेमींना लवकर उठावे लागणार आहे.
गिलचे पुनरागमन, राहुल सलामीला?
गुरुवारी भारतीय संघाने केलेल्या सरावानुसार शुभमन गिल संघात परतणार असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे दिसते. गिलला चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले होते. मात्र शुक्रवारी तो फलंदाजीसह स्लीपमध्ये क्षेत्ररक्षणाचा सराव करतानाही दिसला. त्याशिवाय के. एल. राहुल यशस्वी जैस्वालच्या साथीने सलामीला येईल. विराट कोहलीच्या फॉर्मचीही सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यामुळे रोहितनंतर त्याच्याकडेही लक्ष असेल. ऋषभ पंतने या मालिकेत सातत्याने निराश केले आहे. नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंनी फलंदाजीत योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला वगळण्याचा धोका संघ पत्करण्याची शक्यता कमी आहे.
आकाश जायबंदी; हर्षित, प्रसिधमध्ये चुरस
आकाश दीप पाठदुखीमुळे या लढतीस उपलब्ध नसेल, असे गंभीरने स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत भारतीय संघ बुमरा, मोहम्मद सिराज यांच्या साथीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिध कृष्णाला प्राधान्य देऊ शकतो. तसेच हर्षित राणाचाही पर्याय उपलब्ध आहे. चार वेगवान गोलंदाजांना खेळवायचे झाल्यास सुंदर किंवा जडेजाला वगळले जाऊ शकते. बुमराने या मालिकेत सर्वाधिक ३० बळी घेतले असून त्याच्यावरच पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचा भार वाहण्याची जबाबदारी असेल.
मार्शऐवजी वेबस्टर ऑस्ट्रेलिया संघात
अष्टपैलू मिचेल मार्शला ऑस्ट्रेलियाने अंतिम ११ खेळाडूंच्या संघातून वगळले आहे. त्याच्या जागी ६.५ उंचीच्या ब्यू वेबस्टरला संधी देण्यात आली आहे. त्याने शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत ९०० धावा करण्यासह ३० बळीही मिळवले. त्याव्यतिरिक्त मात्र ऑस्ट्रेलियाने कोणताही बदल केलेला नाही. सॅम कोन्स्टास व उस्मान ख्वाजा यांना सूर गवसला आहे. तसेच मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथही लयीत आहे. गेल्या सामन्यात ट्रेव्हिस हेड फक्त १ धाव करू शकला. त्यामुळे तोही धावा करण्यास आतुर असेल. मिचेल स्टार्क, कमिन्स व स्कॉट बोलंड यांचे वेगवान त्रिकुट व फिरकीपटू नॅथन लायन भारतीय फलंदाजांवर आक्रमण करण्यास सज्ज आहेत.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
सिडनीतील गेल्या ३ वर्षांतील बहुतांश कसोटी अनिर्णित राहिलेल्या आहेत. त्यामुळे येथे फलंदाजांना पुरेसे सहाय्य असेल. सुरुवातीचे दोन दिवस वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायी असतील. लढतीच्या अखेरच्या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या कसोटीत पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत खेळ रंगू शकतो.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १११ कसोटी सामन्यांपैकी भारताने ३३, तर ऑस्ट्रेलियाने ४७ लढती जिंकल्या आहेत. ३० कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत, तर एक सामना टाय झाला होता.
भारतापुढील समीकरण कसे?
लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणारी डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतापुढील समीकरण आणखी बिकट झाले आहे. गुणतालिकेत भारताचा संघ ५२.७८ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.
भारताची आता फक्त एकमेव कसोटी शिल्लक असून ती त्यांना जिंकणे अनिवार्य आहे. लढत ड्रॉ (अनिर्णित) राहिल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. मात्र ऑस्ट्रेलियाने ही कसोटी गमावली, तरी त्यांचे श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने शिल्लक आहेत. त्या दोनपैकी एक लढत जिंकली, तरी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर राहील. त्यामुळे श्रीलंकेने भारताला सहाय्य करण्यासाठी दोन्ही कसोटी जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे.
दुसरीकडे भारत, ऑस्ट्रेलियापैकी कुणीही पाचवी कसोटी जिंकली, तर तिकडे श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी जिंकूनही अंतिम फेरी गाठू शकणार नाहीत.
दक्षिण आफ्रिकेने आधीच अंतिम फेरी गाठलेली आहे. त्यामुळे आता फक्त भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांच्यात चुरस आहे.
स्मिथला कसोटी कारकीर्दीतील १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ३८ धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरू शकतो.
सिडनीत झालेल्या आतापर्यंतच्या १३ कसोटींपैकी फक्त १ लढत (१९७८ साली) भारताने जिंकली आहे. गेल्या ३ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (२०१५, २०१९, २०२१) भारताने सिडनी कसोटी किमान अनिर्णित राखली आहे.
भारत
जसप्रीत बुमरा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा, अभिमन्यू ईश्वरन, सर्फराझ खान, तनुष कोटियन, रोहित शर्मा.\
ऑस्ट्रेलिया (अंतिम ११)
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड, ब्यू वेबस्टर.
वेळ : पहाटे ५ वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, डीडी स्पोर्ट्स आणि हॉटस्टार ॲप