क्रीडा

बुमरावर निशाणा साधणे हास्यास्पद! वर्कलोड आणि संघासाठी दुर्दैवी ठरल्याचे काहींचे मत; तेंडुलकरकडून मात्र पाठराखण

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकणे, हा निव्वळ योगायोग आहे. तसेच बुमराच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरून त्याच्यावर निशाणा साधणे हास्यास्पद व चुकीचे आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकणे, हा निव्वळ योगायोग आहे. तसेच बुमराच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरून त्याच्यावर निशाणा साधणे हास्यास्पद व चुकीचे आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने सोमवारी पाचव्या कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने कसोटीच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी धावांच्या फरकाने यश संपादन केले. याबरोबरच भारताने पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताने दिलेल्या ३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ एकवेळ ३ बाद ३०१ अशा सुस्थितीत होता. मात्र मोहम्मद सिराजने केलेल्या प्रभावी माऱ्याला अन्य गोलंदाजांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने इंग्लंडचा डाव ३६७ धावांत गुंडाळला. सिराजला सामनावीर, तर एकूण ४ शतके झळकावणाऱ्या गिलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताने सलग दुसऱ्यांदा इंग्लंडला कसोटी मालिकेत बरोबरीत रोखले.

मात्र बुमरा या मालिकेतील तीनच कसोटींमध्ये खेळू शकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत झालेल्या मालिकेत बुमराला पाचव्या कसोटीत पाठदुखीने त्रस्त केले. त्यानंतर त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. बुमराने त्या मालिकेत ३२ बळी मिळवून मालिकावीर पुरस्कारही पटकावला होता. तसेच इंग्लंडविरुद्ध बुमराने तीन कसोटींमध्ये १४ बळी मिळवले. मात्र दुर्दैवाने तो संघाचा भाग असताना, भारताला एकही कसोटी जिंकता आली नाही. बुमरा अनुक्रमे लीड्स, लॉर्ड्स व मँचेस्टर येथील पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या कसोटीत खेळला. यांपैकी पहिली व तिसरी कसोटी भारताने गमावली. तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली. तर बुमरा संघाचा भाग नसताना भारताने दुसरी व पाचवी म्हणजेच एजबॅस्टन व ओव्हल येथील कसोटी जिंकली. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर बुमरावर निशाणा साधला जात आहे.

वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजेच खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन यामुळे बुमरा मालिकेत तीनच कसोटी खेळू शकला. तर सिराजने पाचही कसोटीत त्याच जोशात गोलंदाजी करून २३ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धही सिराज पाचही कसोटी खेळला होता. त्यामुळे यावरून सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.

“बुमरासारखा गोलंदाज दशकात एकदाच लाभतो. त्याने भारतासाठी आतापर्यंत अमूल्य योगदान दिले आहे. भारताने पाचवी कसोटी जिंकल्यापासून मी पाहत आहे की अनेकांनी बुमरावर निशाणा साधला आहे. हे पूर्णपणे दुर्दैवी व चुकीचे आहे. ज्या तीन सामन्यांत तो खेळला, तेव्हा त्याने सर्वस्वी योगदान दिले,” असे तेंडुलकर म्हणाला.

“बुमरा संघात असताना गोलंदाजांची ताकद आपोआप वाढते. तो नसताना आपण जिंकणे हा फक्त योगायोग आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुमरा असतानाच आपण जिंकलो होतो, हे विसरू नका. बुमराची पाठदुखीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे अधिक जोखीम घेतली, तर कदाचित त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. मात्र जेव्हाही तो मैदानात असेल, तेव्हा भारतीय संघ नक्कीच सुस्थितीत असेल,” असेही तेंडुलकरने सांगितले.

दरम्यान, आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. परिणामी रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन असे तारांकित खेळाडूही एकामागोमाग कसोटीतून निवृत्त झाले. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने तंदुरुस्तीच्या कारणास्तव कर्णधारपद नाकारले. त्यामुळे गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.

गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. २०२१-२२च्या मालिकेतसुद्धा भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भारताने पिछाडीवरून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे पाचव्या कसोटीतील विजय खास आहे. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर १८ वर्षांपासून भारताला येथे मालिका विजयाची प्रतीक्षा आहे.

सिराज, सुंदरचे विशेष कौतुक

कर्णधार गिलने या मालिकेत फलंदाजी व नेतृत्वात छाप पाडली, यात शंका नाही. मात्र दोन खेळाडूंचा मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल आणि ती म्हणजे वॉशिंग्टन सुंदर व सिराज. सुंदरने मिळेल तेव्हा संघासाठी कठीण परिस्थितीत फलंदाजी केली. गोलंदाजीतही तो चमक दाखवत होता. तर सिराजने संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. तो सातत्याने लढवय्याप्रमाणे गोलंदाजी करत होता. पाचव्या कसोटीत सिराजने केलेला मारा अप्रतिम होता, असेही तेंडुलकरने नमूद केले.

सिराजचे मायदेशी आगमन

भारताचा वेगवान गोलंदाज सिराजचे बुधवारी मुंबईत आगमन झाले. तेथून तो राहत्या घरी म्हणजेच हैदराबादला रवाना झाल्याचे समजते. सिराजच्या आगमनाच्या वेळी मुंबई विमानतळावर क्रीडाप्रेमींची गर्दी होती. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सिराजने २३ बळी मिळवले. मुख्य म्हणजे पाचही कसोटी खेळून त्याने तंदुरुस्ती टिकवल्याने सध्या चोहीकडून सिराजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. सिराज आता थेट वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. कारण आशिया चषकासाठी टी-२० प्रकारात त्याला विश्रांती देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ९ सप्टेंबरपसून आशिया चषक सुरू होईल.

जागतिक क्रमवारीत सिराज, यशस्वीची झेप

आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी झेप घेतली आहे. ५ सामन्यांत २३ बळी मिळवणाऱ्या सिराजने १२ स्थानांची झेप घेत कारकीर्दीत प्रथमच १५वे स्थान पटकावले. भारताचा जसप्रीत बुमरा अग्रस्थानी टिकून आहे. फलंदाजांमध्ये यशस्वीने ७९२ गुणांसह पाचवे स्थान मिळवताना तीन स्थानांनी आगेकूच केली. तसेच ऋषभ पंत आठव्या स्थानी आहे. इंग्लंडचा जो रूट फलंदाजांमध्ये अग्रस्थानी विराजमान आहे.

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी गिलला नामांकन

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४ शतकांसह ७५४ धावा फटकावणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला आयसीसीच्या जुलै महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. आयसीसीने २०२१पासून दर महिन्यात हा पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली आहे. गिलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २६९ धावांची खेळी साकारली. तसेच एका मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता दुसऱ्या स्थानी आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी ८१० धावा केल्या होत्या. गिलसह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स व दक्षिण आफ्रिकेचा वियान मल्डर यांनाही नामांकन लाभले आहे.

वडिलोपार्जित जमिनीचे वाटप सुकर; शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

घरातील सोने बँकांमध्ये? उत्पन्नासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचा नवा आराखडा, सुवर्ण संघटनेची रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

वाढत्या उष्णतेचा जनावरांनाही फटका; फॉगर बसवून तापमान नियंत्रणाचा प्रयोग