मेलबर्न : स्पेनच्या कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न पार्कवर नव्या अध्यायाची नोंद केली. कारकीर्दीतील चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधणारा सर्वात युवा टेनिसपटू होण्याचा मान अल्कराझने पटकावला. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा झंझावात रोखत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या अल्कराझने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
कार्लोस अल्काराझचे हे कारकीर्दीतील सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. तब्बल तीन तास आणि दोन मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात तब्बल चार सेटपर्यंत दोघांनी संघर्ष केला. अखेरीस अल्कराझने पहिला सेट गमावूनही पुढील तीन सेट जिंकत जेतेपद आपल्या नावावर केले. अल्कराझने हा सामना २-६, ६-२, ६-३, ७-५ असा जिंकला. या पराभवामुळे नोव्हाक जोकोव्हिचचे कारकीर्दीतील २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले. जोकोव्हिचचा हा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीतील पहिलाच पराभव ठरला. याआधी त्याने १०वेळा अंतिम फेरीत विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना होता. हा सामना जिंकत कार्लोस अल्काराझने विश्वविक्रमाला गवसणी घातली. कार्लोस अल्कराझने कारकीर्दीतील चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करत इतिहासातील सर्वात तरुण ‘करिअर स्लॅम’ विजेता होण्याचा मान पटकावला. वयाच्या फक्त २२व्या वर्षी (२२ वर्षे आणि २७२ दिवस) त्याने करियर स्लॅम पूर्ण केले. यापूर्वी रॉड लेव्हर (२४ वर्षे ३२ दिवस), राफेल नदाल (२४ वर्षे १०२ दिवस), रॉजर फेडरर (२७ वर्षे ३०३ दिवस), नोव्हाक जोकोव्हिच (२९ वर्षे १५ दिवस) आणि आंद्रे आगासी (२९ वर्षे ६८ दिवस) या दिग्गज टेनिसपटूंनी त्या-त्या वर्षी आपले करिअर स्लॅम पूर्ण केले होते. उपांत्य फेरीत दोघांनाही जवळपास पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्याआधी दोघांच्याही फिटनेसचा तसेच स्टॅमिना आणि खेळाडूवृत्तीचा कस लागला होता. अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराझने पहिला सेट गमावला. उपांत्य फेरीत दोघांनाही बराच घाम गाळावा लागल्यामुळे अंतिम फेरीत त्यांच्या हालचालींवर तसेच कोर्टवरील चपळाईवरती काहीशा मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे दोघेही मोठ्या रॅली आणि दमदार फटक्यांवर भर देत नव्हते. पहिला सेट गमावल्यानंतर अल्कराझने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये अल्कराझला जोकोव्हिचचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. मात्र युवा खेळाडू अल्कराझने जोकोविचचे आक्रमक फटकेही अफलातून चपळतेने त्याने परतवून लावले आणि ३८ वर्षीय प्रतिस्पर्ध्यावर सातत्याने प्रचंड दबाव ठेवला.
जोकोविच आपल्या विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी उत्सुक होता. यापूर्वीही अल्कराझ आणि जानिक सिनर यांनी तब्बल ९ वेळा त्याची वाटचाल रोखली होती. यावेळीही अल्कराझने जोकोव्हिचचे २५ ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
“हे विजेतेपद जिंकण्यासाठी मी किती परिश्रम घेतले आहेत, याची कल्पना कुणालाही नाही. त्यामुळे हे विजेतेपद माझ्यासाठी स्वप्नवत असेच आहे. त्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच माझी वाटचाल योग्य दिशेने ठेवली होती. प्रत्येक दिवशी मी चांगली कामगिरी करावी, यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता. आता विजेतेपद जिंकल्याने आणि करिअरमधील चारही ग्रँडस्लॅम ताफ्यात आल्यामुळे मी बेहद खूश आहे,” असे अल्कराझने विजेतेपदानंतर सांगितले.
करियर स्लॅम म्हणजे काय?
कोणत्याही टेनिसपटूसाठी ग्रँडस्लॅम जेतेपद हे सर्वोच्च शिखर मानले जाते. प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा होतात. या चारही स्पर्धा जिंकण्यासाठी टेनिसपटू प्रयत्नांची पराकाषअठा करतात. कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे म्हणजेच ‘करियर स्लॅम’ होय. कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचचा पराभव करत चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा टप्पा पूर्ण केला आणि आपल्या कारकिर्दीतील पहिला ‘करिअर ग्रँडस्लॅम’ साकारला. या ऐतिहासिक यशासह अल्काराझ हा पराक्रम करणारा नववा आणि इतिहासातील सर्वात युवा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
अल्कराझची ग्रँडस्लॅममधील कामगिरी
१ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्लोस अल्कराझने आपल्या कारकीर्दीतील सातव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. २०२२मध्ये अल्कराझने अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावत आपले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम मिळवले होते. २०२३मध्ये त्याने आपले पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले. त्यानंतर २०२४मध्येही त्याने विम्बल्डनचे जेतेपद आपल्याकडेच राखले. फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने २०२४ आणि २०२५मध्ये बाजी मारली आहे.