नवी दिल्ली : बुधवारपासून सुरू होणाऱ्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात पोहोचलेल्या भारतीय बुद्धिबळ संघाला हॉटेलची रूम न मिळाल्याने ५ तासांपेक्षा जास्त वेळ ताटकळत राहावे लागले. मंगळवारी हे खेळाडू समरकंदमध्ये दाखल झाले होते, मात्र तासन् तास वाट पाहूनही त्यांना खोल्यांचे वाटप झाले नव्हते.
भारतीय पुरुष संघाचा कर्णधार आणि ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणन यांनी सोशल मीडियावर या गोंधळाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. “फिडे २०२६ ऑलिम्पियाडमध्ये अत्यंत वाईट अनुभव येत असून समरकंद विमानतळावर उतरून ५ तास झाले तरी अद्याप खोल्या मिळालेल्या नाहीत आणि त्या कधी मिळतील याची कोणतीही स्पष्टता नाही,” अशी पोस्ट श्रीनाथ नारायणन यांनी एक्सवर केली. ग्रँडमास्टर विदित गुजरातीनेही या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत, समरकंद ऑलिम्पियाडची ही पहिलीच छाप अत्यंत खराब पडल्याचे म्हटले.
भारतीय पुरुष संघात जगज्जेता डी. गुकेश, ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, निहाल सरिन आणि विदित गुजराती यांचा समावेश असून श्रीनाथ नारायणन संघाचे कर्णधार आहेत. महिला संघात कोनेरू हम्पी, आर. वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल आणि सविता श्री बी. यांचा समावेश असून स्वयंम मिश्रा कर्णधार आहेत. २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष आणि महिला दोन्ही विभागांत विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरत आहे. १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.
जागतिक विजेता डी. गुकेश, प्रज्ञानंद, कँडिडेट्स विजेती आर. वैशाली, विश्वचषक विजेती दिव्या यांच्याकडे प्रामुख्याने या स्पर्धेत नजरा असतील.