CSK vs PBKS, IPL 2026 : चेपॉकवर चेन्नईला सूर गवसणार? झुंजार पंजाब किंग्जविरुद्ध आज सामना; ऋतुराज, सॅमसनच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष (Photo-@sportsmintmedia)
क्रीडा

CSK vs PBKS, IPL 2026 : चेपॉकवर चेन्नईला सूर गवसणार? झुंजार पंजाब किंग्जविरुद्ध आज सामना; ऋतुराज, सॅमसनच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्जची यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पराभवाने सुरुवात झाली.

Swapnil S

चेन्नई : महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्जची यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पराभवाने सुरुवात झाली. आता शुक्रवारी घरच्या मैदानात म्हणजेच चेपॉक येथील एमए चिदम्बरम स्टेडियमवर चेन्नईला सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल. लयीत असलेल्या पंजाब किंग्जशी चेन्नईची गाठ पडणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच पाच लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. त्यामुळे नाणेफेक व दवाचा घटक यावेळी निर्णायक ठरत आहे. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.

दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला सलामीच्या लढतीत राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा संघ १२७ धावांतच गारद झाला होता. धोनी पायाच्या दुखापतीमुळे किमान दोन आठवडे अनुपलब्ध असल्याने ऋतुराज, संजू सॅमसन, शिवम दुबे व आयुष म्हात्रे यांच्यावर चेन्नईची फलंदाजी अवलंबून आहे. तसेच डेवाल्ड ब्रेविससुद्धा स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. अशा स्थितीत चेन्नईच्या फलंदाजांचा पुन्हा कस लागेल. गोलंदाजीत फिरकीपटू नूर अहमद चेन्नईसाठी महत्त्वाचा आहे. खलिल अहमद, मॅट हेन्री व जेमी ओव्हर्टन असे वेगवान त्रिकुट त्यांच्याकडे आहे.

दुसरीकडे मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने पहिल्या लढतीत गुजरातवर विजय मिळवला. पंजाबची फलंदाजीदेखील त्या लढतीत चांगल्या सुरुवातीनंतर ढेपाळली होती. श्रेयस, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, नेहल वधेरा यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. कूपर कोनोलीच्या रुपात पंजाबला नवा तारा गवसला आहे. गोलंदाजीत अनुभवी युझवेंद्र चहल व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर पंजाबची भिस्त आहे. चाहत्यांना दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

उभय संघांत आतापर्यंत ३२ आयपीएल सामने झाले असून चेन्नईने १६, तर पंजाबनेदेखील १६ लढती जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी पंजाबने चेन्नईले दोन्ही लढतींमध्ये नमवले होते. त्यामुळे तूर्तास पंजाबचे पारडे जड दिसत असून चेन्नई पलटवार करू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल. आयपीएलच्या इतिहासात एकंदर तिसऱ्यांदा चेन्नईचा संघ चेपॉक स्टेडियमवर धोनीच्या अनुपस्थितीत सामना खेळणार आहे. तसेच यंदाच्या हंगामातील पहिल्या लढतीत प्रथमच धोनी व रैना या दोन्ही खेळाडूंसह चेन्नईचा संघ आयपीएलचा सामना खेळला. यावरूनच धोनीचे महत्त्व अधोरेखित होते.

धोनी, ब्रेविस तंदुरुस्तीच्या मार्गावर

चेन्नईचा माजी कर्णधार धोनी व युवा फलंदाज ब्रेविस यांनी गुरुवारी नेटमध्ये सराव केला. धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे किमान २ आठवडे मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याने हळूहळू सरावाला प्रारंभ केला आहे. तर ब्रेविस रविवारी बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल असे समजते. ४४ वर्षीय धोनीचा हा आयपीएलचा अखेरचा हंगाम ठरण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला धावतानाही संघर्ष करावा लागत असल्याचे गतवर्षी दिसून आले. यंदा सरावात धोनीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे धोनी दोन आठवडे विश्रांतीवर आहे.

खेळपट्टीचा अंदाज

टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध झिम्बाब्वे लढत ज्या खेळपट्टीवर झाली होती, तेथेच शुक्रवारचा सामना होईल. त्यामुळे फलंदाजांकडून चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित असून फिरकीपटूंनाही चेपॉकवर सहाय्य लाभते. पावसाचे या लढतीवर सावट नसेल.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार

गोदावरी महामंडळाच्या निधीत मोठी कपात; भूसंपादनासाठी ३०० कोटींचा निधी रखडला

घारापुरी बेटावर प्रगत जलव्यवस्थापनाचा उलगडा; पुरातत्त्व विभागाचे उत्खनन, जागतिक व्यापाराचे केंद्र असल्याचेही समोर

राजा रवी वर्मांचे चित्र १६७ कोटींना; सायरस पूनावाला यांनी केली खरेदी

लाचखोर ठेका अभियंत्याची बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नियुक्ती; स्वराज अभियानचा आक्षेप, सेवेतूनच कमी करण्याची मागणी!