नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारतीय संघातून वैद्यकीय कारणास्तव वगळण्यात आलेल्या वुशूपटू दिव्यांशी चौधरीने शनिवारी राष्ट्रीय वुशू महासंघावर गंभीर आरोप केले. डॉक्टरांनी जपानमध्ये स्पर्धा खेळण्यास परवानगी दिल्यानंतरही आपले नाव संघातून वगळण्यात आले असून, महासंघाकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.
क्रीडा मंत्रालयाने २२ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सात सदस्यीय वुशू संघात दिव्यांशीचा समावेश होता. मात्र, शुक्रवारी महिलांच्या ६० किलो सांडा गटात तिच्या जागी दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेल्या नोरेम रोशिबिना देवीचा समावेश करण्यात आला. दिव्यांशीच्या गुडघ्याला एसीएलची दुखापत झाल्याचे कारण देत हा बदल करण्यात आला.
वुशू असोसिएशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएआय) दिव्यांशीच्या एमआरआय तपासणीत मोठ्या प्रमाणात सूज आणि एसीएलला गंभीर स्वरूपाची अंशतः दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव तिच्या जागी रोशिबिनाला संधी देण्यात आल्याचा महासंघाचा दावा आहे. मात्र, दिव्यांशीने सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओत महासंघावर गंभीर आरोप केले.
जूनपासून सप्टेंबरपर्यंत आपला मानसिक छळ होत असल्याचे सांगताना ती भावूक झाली. रोशिबिनाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यामुळे आपल्याला संघातून हटवण्यात आल्याचा आरोप तिने केला. निवड चाचणीत आपण रोशिबिनाचा पराभव केला असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा आपल्याला अधिकार असल्याचेही तिने सांगितले.
क्रीडा मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले की, राष्ट्रीय महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) दिव्यांशी दुखापतग्रस्त असल्याची माहिती दिल्यानंतर प्रस्थापित नियमानुसार संघात बदल करण्यात आला. ९ सप्टेंबर रोजी दिव्यांशीला संघातून माघार घ्यावी लागणार असल्याची माहिती महासंघाने आयओएला दिली. त्यानुसार अंतिम संघात बदल करण्यात आला आणि दुखापतीमुळे खेळाडू बदलण्याच्या प्रचलित नियमानुसार मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली. दरम्यान, दिव्यांशीने यापूर्वीही काही व्यक्तींकडून आपल्याला शारीरिक त्रास देण्यात आल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्येची धमकी
व्हिडीओमध्ये दिव्यांशीने आत्महत्येची धमकीही दिल्याचे दिसून आले. ती कोटा येथील असून सध्या पटियाला येथील एनआयएसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. मात्र, डब्ल्यूएआयने दिव्यांशीला केवळ दुखापतीमुळेच संघातून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, २४ ते २९ जूनदरम्यान चीनमधील हुबेई येथे झालेल्या २०२६ एससीओ वुशू सांडा स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याची माहिती दिव्यांशीने स्वतः महासंघाला दिली होती. त्यानंतर सुमारे एक महिना घरी राहिल्यानंतर ती १० ऑगस्ट रोजी पटियाला येथील राष्ट्रीय शिबिरात दाखल झाली.