बेंगळुरू : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी, बंगालचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (५६ धावांत ३ बळी) व मुकेश कुमार (४४ धावांत ४ बळी) यांच्या भेदक माराच्या जोरावर पूर्व विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या मध्य विभागाचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह पूर्व विभागाने २०१२-१३च्या हंगामानंतर प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ६ सप्टेंबरपासून चेपॉक स्टेडियमवर सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाची दक्षिण किंवा उत्तर विभागाशी गाठ पडेल.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शमी आणि मुकेश यांनी शानदार गोलंदाजी करत मध्य विभागाचा दुसरा डाव १५८ धावांत गुंडाळला. मुकेशने या सामन्यात एकूण ७ बळी टिपले, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. शमीने ५६ धावांत ३, तर मुकेशने ४४ धावांत ४ बळी घेतले. मध्य विभागाकडून हर्ष दुबे आणि अर्शद खान यांनी नवव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केल्यामुळे त्यांना १५० धावांचा टप्पा ओलांडता आला.
विजयासाठी मिळालेल्या १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फिरकीला साथ देणाऱ्या पट्टीवर पूर्व विभागाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. वैभव सूर्यवंशीने ४३ चेंडूंत ४० धावांची फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने यश ठाकूरच्या एकाच षटकात तीन चौकार आणि एक षटकार ठोकला, मात्र त्याच षटकात रजत पाटीदारने त्याचा झेल घेतला.
वैभव बाद झाल्यानंतर पूर्व क्षेत्राची आघाडीची फळी घसरली आणि १२४ धावांत ५ गडी बाद झाले. डाव अडचणीत सापडला असताना कर्णधार ईशान किशनने संयमी फलंदाजी करत ४१ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाला सहजरीत्या विजयाकडे नेले. या विजयानंतर अभिमन्यू ईश्वरनने सांगितले की, संपूर्ण संघ अंतिम सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे.
सांगवानचे अर्धशतक; दक्षिण विभाग वरचढ
उत्तर विभागाचा डावखुरा फलंदाज सनत सांगवान याने संयमी ७६ धावांची खेळी करत टीकाकारांना चोख उत्तर दिले. मात्र, तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण विभाग या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजयाच्या मजबूत स्थितीत पोहोचले आहे. उपांत्यपूर्व सामन्यातून सांगवानला वगळल्यामुळे संघनिवडीवर प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने (नाबाद ११६) आदल्या दिवशीच्या धावसंख्येत १० धावांची भर घातली. त्यांनी पहिल्या डावात ३१२ धावा करून एकूण ११७ धावांची आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात उत्तर विभागाने तिसऱ्या दिवसाखेर ७ बाद २५६ धावा केल्या. उत्तर विभागाकडे सध्या केवळ १३९ धावांची आघाडी आहे. अन्यथा पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर दक्षिण विभाग अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकतो.