बंगळुरू : दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपउपांत्य सामन्यात तिसऱ्या दिवशी उत्तर विभागाने पुनरागमन करत सामन्यातील रंगत वाढवली आहे. पश्चिम विभागाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ६७ धावांची, तर उत्तर विभागाला ३ बळींची गरज आहे.
२८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुशीर खान (१२६ चेंडूंत ९६ धावा) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (७० चेंडूंत ६६ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पश्चिम विभाग मजबूत स्थितीत होता. मात्र, उत्तर विभागाच्या गोलंदाजांनी लागोपाठ बळी घेत पश्चिम विभागाची अवस्था ७ बाद २२० अशी केली. दिवसअखेर पश्चिम विभागाला विजयासाठी अजून ६७ धावांची गरज असून उर्विल पटेल १७ धावांवर खेळत आहे.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात १९५ वर ३ अशी स्थिती असताना कर्णधार ऋतुराज गायकवाड (७० चेंडूंत ६६ धावा) धावचित झाला. त्यानंतर स्थिरावलेला मुशीर खान ९६ धावांवर बाद झाल्याने पश्चिम विभागाला मोठा धक्का बसला. मुशीरने १२६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावांची खेळी केली. ऋतुराज आणि मुशीर यांनी चौथ्या बळीसाठी १११ धावांची भागीदारी केली होती. या दोन फलंदाजांशिवाय शिवालिक शर्माने २८ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी घेणाऱ्या उत्तर विभागाचा दुसरा डाव २२२ धावांवर गुंडाळला गेला. उत्तर विभागाकडून आयुष बडोनी (५०) आणि निशांत सिंधू (४४) यांनी प्रतिकार केला. पश्चिम विभागाकडून तनूष कोटियन याने ४६ धावांत ४ बळी आणि शम्स मुलानी याने ७८ धावांत ४ बळी घेतले. पहिल्या डावात उत्तर विभागाने २५१ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना पश्चिम विभागाचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला होता. उत्तर विभागाच्या आबिद मुश्ताकने ३९ धावांत ५ बळी घेतले होते.
दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पूर्व विभागाने ईशान्य विभागाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. त्यांच्यासमोर आता मध्य विभागाचे आव्हान असेल. तर पश्चिम किंवा उत्तर विभागातील विजेता दक्षिण विभागाशी उपांत्य फेरीत दोन हात करणार आहे.