न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक स्पर्धेतून सहयजमान अमेरिका आणि मेक्सिकोचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यांच्या तिकीट दरात प्रचंड घसरण झाली आहे. या घसरणीदरम्यान फिफाने अंतिम सामन्यासाठी आणखी सुमारे १,२०० जागा विक्रीसाठी उपलब्ध केल्या असून, या एका तिकिटाची किंमत ७,३८० डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली आहे.
कॅलिफोर्नियातील इंगलेवुड येथे शुक्रवारी झालेल्या स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील सामन्याच्या तिकिटाचे किमान दर १,३८१ डॉलरवर आले आहेत. अमेरिका संघ बेल्जियमकडून पराभूत होण्यापूर्वी या तिकिटाची किंमत ३,२६१ डॉलर इतकी होती. फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथे शनिवारी होणाऱ्या इंग्लंड आणि नॉर्वे सामन्याच्या तिकिटाचे दर २,०४९ डॉलरपर्यंत खाली आले असून, मेक्सिकोचा पराभव होण्यापूर्वी हा दर ३,८६६ डॉलरवर होता. मिसूरीतील कॅन्सस सिटी येथे होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड सामन्याचे तिकीटही २,३८१ डॉलरवरून थेट १,१४२ डॉलरवर घसरले आहेत.
सोफाय स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या जेक व्हान बार्सेल यांनी तिकीट दरात घट झाल्यानंतर आपल्या १३ वर्षांच्या नातवासाठी प्रत्येकी १,००० डॉलर देऊन दोन तिकिटे खरेदी केली. नातवासोबतच्या या आठवणी मौल्यवान असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व लॉस एंजेलिसचे ७० वर्षीय लिसांद्रो पिनेडा यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे महिनाभरापूर्वी २,२०० अमेरिकी डॉलर मोजून तिकीट खरेदी केले. "माझ्या मते ही किंमत खूपच जास्त होती. पण हे पुनर्विक्री (रिसेल) तिकीट होते, हे घ्या. मला या लक्षात अनुभवापासून वंचित राहायचे नव्हते. मी यापूर्वी कधीही विश्वचषक पाहिला नाही. याआधी आमच्याकडे झालेल्या विश्वचषकालाही मी जाऊ शकलो नव्हतो. त्यामुळे माझ्याकडे पैसे आहेत, वेळही आहे, मग विचार कसला? तिकीट घेतले आणि आता आम्ही येथे आहोत," असे पिनेडा म्हणाले.
दुसरीकडे, आधीच तिकीट खरेदी करणाऱ्या चाहत्यांना मोठा फटका बसला आहे. लॉस एंजेलिसचे ६८ वर्षीय कुरोश मोदारेस यांनी फिफाच्या विक्री फेरीत तिकीट न मिळाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी श्रेणीतील प्रत्येकी ७,००० डॉलरचे तिकीट खरेदी केले असून, हे दर म्हणजे दिवसाढवळ्या लूट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अंतिम फेरीच्या तिकिटांविषयी
अंतिम फेरीचा सामना ईस्ट रुदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर १९ जुलै रोजी रंगणार असून फिफाने या सामन्यासाठी ७,३८० डॉलर किमतीची १२०० अतिरिक्त तिकिटे विक्रीसाठी ठेवली आहेत.
फिफाने शेवटच्या मिनिटाला जाहीर केलेल्या या निर्णयानुसार, पाच गटात १,१७८ तिकिटे उपलब्ध झाली आहेत.
फिफाच्या प्रथम श्रेणीतील एक तिकिट हे १९,९९५ ते ३२,९७० डॉलरच्या दरम्यान विकले गेले आहे. तसेच ट्रॉफी लाऊंज आणि ट्रॉफी लाऊंज प्लस या श्रेणीतील तिकिटे ही खाण्या-पिण्यासह अनुक्रमे ३४,५०० आणि ३२,५०० अमेरिकन डॉलरला विकली जात आहेत.