FIFA World Cup 2026 : इंग्लंडची सलग तिसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : इंग्लंडची सलग तिसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक

२३ वर्षीय आक्रमणपटू ज्यूड बेलिंघम आणि कर्णधार हॅरी केन यांनी केलेल्या गोलच्या बळावर इंग्लंडने सोमवारी फिफा विश्वचषकात मेक्सिकोवर ३-२ अशी मात केली.

Swapnil S

मेक्सिको सिटी : २३ वर्षीय आक्रमणपटू ज्यूड बेलिंघम आणि कर्णधार हॅरी केन यांनी केलेल्या गोलच्या बळावर इंग्लंडने सोमवारी फिफा विश्वचषकात मेक्सिकोवर ३-२ अशी मात केली. अखेरच्या मिनिटापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या लढतीत सरशी साधून इंग्लंडने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर यजमान मेक्सिकोचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. मुख्य म्हणजे मेक्सिकोला घरच्या मैदानात प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले.

मेक्सिको सिटी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत उत्तरार्धात एक खेळाडू कमी झाल्यानंतरही इंग्लंडने मेक्सिकोच्या मैदानातील प्रचंड उंची, स्थानिक प्रेक्षकांचा दबाव आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हा विजय मिळवला. १९८६च्या विश्वचषकात याच एस्टाडिओ अइटेका मैदानावर इंग्लंडला दिएगो मॅराडोनाच्या 'हँड ऑफ गॉड' गोलमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र ४० वर्षांनंतर केनच्या कामगिरीने इंग्लंडला त्याच मैदानावर

ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बाद फेरी हा स्पर्धांमधील असा टप्पा असतो जिथे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा मार्ग शोधावा लागतो आणि संघाने तेच करून दाखवले, अशा शब्दांत इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुचेल यांनी संघाच्या मानसिकतेचे कौतुक केले.

मैदानावर मेक्सिकोने यंदाच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात बेलिंघमने ३६व्या आणि ३८व्या मिनिटाला अवघ्या ९८ सेकंदांच्या अंतराने दोन गोल करत उपस्थित ८०,८२४ प्रेक्षकांना थक्क केले. या विश्वचषकातील तीन सामन्यांसह सलग १० सामने जिंकले होते, मात्र इंग्लंडने त्यांचे हे वर्चस्व मोडून काढले. मेक्सिकोसाठी ज्युलियन क्विनोनेस याने ४२व्या मिनिटाला पहिला गोल केला.

दुसऱ्या सत्रात ५४व्या मिनिटाला जेसस गॅलार्डोविरुद्ध धोकादायक फॉऊल केल्यामुळे इंग्लंडच्या जॅरेल क्वान्सा याला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे इंग्लंडला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. यानंतर मेक्सिकोचा गोलरक्षक राऊल रँगेल याच्या चुकीमुळे इंग्लंडला पेनल्टी मिळाली आणि कर्णधार हॅरी केन याने त्याचे गोलमध्ये रूपांतर करत इंग्लंडची आघाडी ३-१ अशी मजबूत केली. केनचा या विश्वचषकातील हा सहावा, तर कारकिर्दीतील १४वा विश्वचषक गोल ठरला. या गोलसह त्याने पश्चिम जर्मनीच्या गर्ड म्युलर यांच्याशी बरोबरी साधली आहे.

यानंतर सामन्यात आणखी एक प्रसंग घडला, जेव्हा केनने केलेल्या फॉऊलमुळे मेक्सिकोला पेनल्टी मिळाली. १९६६ नंतर विश्वचषकातील एकाच सामन्यात गोल करणारा आणि पेनल्टी देणारा

तो पहिला खेळाडू ठरला. मेक्सिकोच्या राऊल जिमेनेझ याने पेनल्टीवर गोल करत गोलफलक ३-२ असा केला. शेवटची २१ मिनिटे आणि भरपाई वेळेतील ११ मिनिटे मेक्सिकोने जोरदार हल्ले चढवले, परंतु गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड आणि इंग्लंडच्या बचावपटूंनी मेक्सिकोला बरोबरी करू दिली नाही. या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडचा संघ शनिवारी फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथे नॉर्वेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.

दरम्यान, सामन्यानंतर झालेल्या जल्लोषात जाहिरातीच्या बोर्डवरून पडल्यामुळे इंग्लंडचा मिडफिल्डर जॉर्डन हेनडरसन याच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेक्सिकोचा संघ १९८६ नंतर कधीही विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकलेला नाही.

यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. आता विश्वचषकाचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे.

गोलफलक

इंग्लंड (३) - मेक्सिको (२)

बेलिंघम (३६वे, ३८वे मिनिट) - केन (६० मि.)

क्विनोनेझ (४२) - जिमिनेझ (६९)

आजचे सामने

  • अर्जेंटिना वि. इजिप्त (रात्री ९.३० वाजता)

  • स्वित्झर्लंड वि. कोलंबिया (मध्यरात्री १.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ अॅप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

नागरिकांच्या मृत्यूनंतरच BMC जागी होणार का? मॅनहोल्सप्रकरणी मुंबई हायकोर्टाने फटकारले; पालिकेचे प्रतिज्ञापत्र केवळ धूळफेक

उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी

नाशिकला आज ढगफुटीचा इशारा

Taj Mahal Survey : ताजमहालप्रकरणी प्रतिज्ञापत्राचे आदेश