फिलाडेल्फिया : फिफा विश्वचषकात शुक्रवारी इ-गटात आयव्हरी कोस्टने लय भारी कामगिरी करताना प्रथमच बाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला. निकोलस पेपेने केलेल्या दोन गोलच्या जोरावर आयव्हरीने कुरासाओचा २-० असा पराभव करताना ऐतिहासिक भरारी घेतली. त्यांनी इ-गटात ३ सामन्यांत २ विजयांचे ६ गुण कमावले. कुरासाओला मात्र पदार्पणाच्या विश्वचषकात साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
फिलाडेल्फियामध्ये झालेल्या या लढतीत सातव्याच मिनिटाला ३१ वर्षीय पेपेने गोल करून आयव्हरी कोस्टला १-० अशी आघाडी मिळवून दिली. कुरासाओची बचावफळी या गोलनंतर दबावखाली आली होती. सामन्याच्या ६४व्या मिनिटाला पेपेने पुन्हा एकदा आपल्या डाव्या पायाने उत्कृष्ट किक लगावत दुसरा गोल नोंदवला आणि संघाचा विजय निश्चित केला. या विजयानंतर आयव्हरी कोस्टच्या खेळाडूंनी मैदानावरच नृत्य करत जल्लोष केला.
आयव्हरी कोस्टचे मुख्य प्रशिक्षक इमर्स फाए यांनी या विजयावर समाधान व्यक्त केले. “हा विजय संपूर्ण संघाचा आहे. आता बाद फेरीत कोणाशी गाठ पडेल, याचा विचार करण्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे,” असे मत फाए यांनी व्यक्त केले. ३० जून रोजी आयव्हरी कोस्टचा सामना फ्रान्स किंवा नॉर्वे यांच्यात पराभूत झालेल्या संघाशी म्हणजेच आय-गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल.
कुरासाओसाठी विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपला असला तरी, त्यांचे प्रशिक्षक डिक यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले. कुरासाओचा गोलरक्षक इलोय रूम याने संपूर्ण सामन्यात चपळाईने बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पेपेच्या आक्रमणासमोर त्याला हार पत्करावी लागली.