न्यूयॉर्क : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच गुरुवारपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर रंगणार आहे. क्रीडा विश्वातील सर्वात मोठा सोहळा मानल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वचषकासाठी मध्यरात्रीपासून ४८ संघांत चढाओढ सुरू होईल. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी हल्लागोलसाठी सज्ज झाले आहेत.
१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगणार आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत शंका होती. तसेच विविध देशांतील खेळाडूंचे रखडलेले व्हिसा, त्यांची सुरक्षितता, राहण्यासह प्रवासाची व्यवस्था यांमुळे आधीपासूनच स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र या सर्व आव्हानांवर मात करत क्रीडाविश्व फुटबॉलच्या महाकुंभासाठी सज्ज झाले आहे.
१९३०मध्ये पहिला विश्वचषक पार पडला. तेव्हापासून आजवर कधीच सहभागी संघांची सख्या ३२च्या पुढे गेली नव्हती. मात्र फुटबॉलची क्रेझ जगभरात वाढत असून त्यामुळे स्पर्धाही रंगतदार होत आहे. म्हणूनच यंदा जागतिक फुटबॉल महासंघाने ४८ संघांचा स्पर्धेत समावेश केला आहे. मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीद्वारे विश्वचषकाचे बिगुल वाजेल. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियाम एम्बाप्पे, नेयमार, हॅरी केन यांसारख्या तारांकित खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी यानिमित्ताने फुटबॉलप्रेमींना मिळेल.
२०२२मध्ये मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून विश्वचषक उंचावला होता. एकीकडे ते सलग दुसऱ्या जेतेपदाचा प्रयत्न करतील, तर २०१८चा विजेता फ्रान्स सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून जेतेपद पटकावण्यास आतुर असेल. अर्जेंटिना फ्रान्ससह, पोर्तुगाल, इंग्लंड, स्पेन हे संघही तितक्याच तयारीने मैदानात उतरतील. बेल्जियम, क्रोएशिया, ब्राझील या संघांनाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे एकूणच ही स्पर्धा रंगतदार होणार आहे.
भारतातही फुटबॉलचा चाहता वर्ग मोठा असल्याने पुढील महिनाभर रसिकांना रात्रीचा दिवस करून सामने पहावे लागतील. कारण बहुतांशी लढती या भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजल्यानंतर सुरू होतील. एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे एकूण १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होईल, हे निश्चित असून लवकरच भारतीय संघही फिफा विश्वचषकासाठी पात्र व्हावा, या आशेने तमाम देशवासी यंदाच्या विश्वचषकाचा आनंद लुटतील.
दोन नव्हे चार सत्र; नक्की स्वरुप कसे?
उष्ण वातावरणामुळे यंदा प्रत्येक लढतीत दोन वेळा पाणी पिण्यासाठी ३ मिनिटांची विश्रांती दिली जाणार आहे. पहिल्या सत्रात २२व्या मिनिटाला, तर दुसऱ्या सत्रात ६७व्या मिनिटाला विश्रांती घेतली जाईल. त्यामुळे याचा खेळाडूंसह प्रशिक्षकांना रणनिती आखण्यास नक्कीच वापर होईल.
एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे एकूण १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ व तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ म्हणजेच एकूण ३२ संघ बाद फेरीत जातील.
साधारणपणे भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजल्यापासून ते सकाळी ९.३० पर्यंतच्या वेळेत १६ ठिकाणी हे सामने होतील. २८ जूनपर्यंत साखळी फेरी रंगणार आहे. त्यानंतर बाद फेरीच्या लढतींना प्रारंभ होईल.
या ताऱ्यांसाठी ठरू शकतो अखेरचा विश्वचषक
अर्जेंटिनाच्या मेस्सीची २०२२च्या विश्वचषकात स्वप्नपूर्ती झाली. यंदाही तो अर्जेंटिना संघाचा भाग असून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे ३८ वर्षीय मेस्सीसह अर्जेंटिनाचे स्वप्न असेल. मात्र ४१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो व त्याचा पोर्तुगाल संघही ऐतिहासिक जेतेपदासाठी आतुर आहे. या दोन्ही ताऱ्यांचा हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिना व पोर्तुगाल आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे झाले, तर चाहत्यांना मेस्सी विरुद्ध रोनाल्डोची जुगलबंदी बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे मेस्सी व रोनाल्डो या दोघांच्याही कारकीर्दीतील हा सहावा फिफा विश्वचषक आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचेच लक्ष असेल.
या ताऱ्यांवरही नजरा
फ्रान्सचा किलियान एम्बाप्पे, स्पेनचा लॅमिन यमाल, ब्राझीलचा व्हिनिशियस ज्युनियर, बेल्जियमचा जेरेमी डोकू यांसारखे काही खेळाडू यंदाचा विश्वचषक गाजवू शकतात. विशेषत: एम्बाप्पेने आधीच २०२२च्या विश्वचषकात गोल्डन बूटचा पुरस्कार पटकावला होता. त्याला यावेळी इंग्लंडच्या हॅरी केनकडून झुंज मिळू शकते. विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत जर्मनीचा निवृत्त खेळाडू मिरोस्लाव्ह क्लोस १६ गोलसह आजही अग्रस्थानी आहे. मेस्सी (१३) व एम्बाप्पे (१२) त्याच्यापासून फारसे मागे नाहीत.
हे सामने चुकवू नका!
ब्राझील वि. मोरोक्को (१४ जून)
बेल्जियम वि. इजिप्त (१६ जून)
फ्रान्स वि. सेनेगल (१७ जून)
इंग्लंड वि. क्रोएशिया (१८ जून)
नेदरलँड्स वि. स्वीडन (२० जून)
स्पेन वि. उरुग्वे (२७ जून)
पोर्तुगाल वि. कोलंबिया (२८ जून)
फिफा विश्वचषकाचे वेळापत्रक (साखळी फेरी)
गटवारी
ए-गट : मेक्सिको, द. आफ्रिका, द.कोरिया, चेक प्रजासत्ताक
बी-गट : कॅनडा, बोस्निया आणि हर्झेगोव्हिना, कतार, स्वित्झर्लंड
सी-गट : ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड
डी-गट : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅराग्वे, तुर्कीये
इ-गट : जर्मनी, आयव्हरी कोस्ट, इक्वाडोर, कुरासाओ
एफ-गट : नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ट्युनिशिया
जी-गट : बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड
एच-गट : स्पेन, उरुग्वे, सौदी अरेबिया, केप व्हर्डे
आय-गट : फ्रान्स, सेनेगल, इराक, नॉर्वे
जे-गट : अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन
के-गट : पोर्तुगाल, उझबेकिस्तान, कोलंबिया, काँगो प्रजासत्ताक
एल-गट : इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा
बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) : २९ जून ते ४ जुलै
उपउपांत्यपूर्व फेरी (राऊंड ऑफ १६) : ४ ते ८ जुलै
उपांत्यपूर्व फेरी : १० ते १२ जुलै
उपांत्य फेरी : १५ आणि १६ जुलै
तिसऱ्या क्रमांकाची लढत : १९ जुलै
महाअंतिम सामना : २० जुलै
(सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यूनाइट८ स्पोर्ट्स वाहिनीसह झी५ ॲपवर केले जाईल.)