रोनाल्डोसह पोर्तुगालचे कमबॅक! सहा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा एकमेव खेळाडू; उझबेकिस्तानचा ५-० असा धुव्वा 
क्रीडा

FIFA World Cup 2026 : रोनाल्डोसह पोर्तुगालचे कमबॅक! सहा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा एकमेव खेळाडू; उझबेकिस्तानचा ५-० असा धुव्वा

एकीकडे लिओनेल मेस्सी, किलियान एम्बाप्पे, अर्लिंग हालँड असे तारांकित आक्रमणपटू यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत छाप पाडत असताना ख्रिस्तियानो रोनाल्डो कधी चमक दाखवणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात रोनाल्डोने याचे उत्तर देत टीकाकारांची तोंडे बंद केली. तब्बल सहा विश्वचषकांत गोल करणारा एकमेव खेळाडू ठरण्याचा मान रोनाल्डोने मिळवला.

Swapnil S

ह्युस्टन : एकीकडे लिओनेल मेस्सी, किलियान एम्बाप्पे, अर्लिंग हालँड असे तारांकित आक्रमणपटू यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत छाप पाडत असताना ख्रिस्तियानो रोनाल्डो कधी चमक दाखवणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात रोनाल्डोने याचे उत्तर देत टीकाकारांची तोंडे बंद केली. तब्बल सहा विश्वचषकांत गोल करणारा एकमेव खेळाडू ठरण्याचा मान रोनाल्डोने मिळवला.

ह्युस्टन स्टेडियमवर झालेल्या के-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात ४१ वर्षीय रोनाल्डोने दोन अफलातून गोल झळकावले. त्याला नुनो मेंडीस आणि राफेल लियो यांनी केलेल्या गोलसह एका स्वयंगोलची साथ लाभली. त्यामुळे पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० असा धुव्वा उडवून एकप्रकारे आपले कमबॅक झाल्याचे जाहीर केले. पोर्तुगालला सलामीच्या लढतीत काँगोने १-१ असे बरोबरीत रोखले होते. रोनाल्डोसह संपूर्ण संघ तेव्हा चाचपडताना दिसलेला. मंगळवारी मात्र रोनाल्डोसह पोर्तुगालने लय मिळवून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. आता ते गटात ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून रविवारी होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात पोर्तुगालची अग्रस्थानावरील कोलंबियाशी गाठ पडेल. कोलंबियाने बाद फेरी गाठलेली असल्याने ते पोर्तुगालला नक्कीच कडवी झुंज देऊ शकतात.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील. त्यामुळे आता थरार वाढणार आहे.

दरम्यान, या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला फर्नांडोसाठी गोल संधी तयार झाली होती, परंतु त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. पुढच्याच मिनिटाला रोनाल्डोकडे क्रॉस आला, परंतु यावेळी तो इंचभर फरकाने चुकला. अखेर सहाव्या मिनिटाला रोनाल्डोने गोलखाते उघडले. कँसोलोच्या क्रॉसवर गोलपोस्टच्या अगदी समोर उभ्या असलेल्या रोनाल्डोने अप्रतिम किकद्वारे गोल केला.

यानंतर १७व्या मिनिटाला मेंडीसने फ्री-किकवर गोल करत आघाडी वाढवली. यावेळी मेंडीस व रोनाल्डोने लढवलेली युक्ती कमालीची होती. ३९व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसच्या पासवर रोनाल्डोने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून मध्यंतरापूर्वीच संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात उझबेकिस्तानचा गोलरक्षक अब्दुवोहिद नेमाटोव्हने स्वयंगोल केल्याने पोर्तुगालच्या खात्यात चौथा गोल जमा झाला. अखेरीस ८७व्या मिनिटाला राफेलने गोलपंचक पूर्ण करून पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

उझबेकिस्तानच्या गनीव याने ३०व्या मिनिटाला गोल केला होता, मात्र व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये तो फेटाळण्यात आला. उझबेकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

टीकाकारांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी केली. २३ वर्षांच्या कारकीर्दीत जेव्हा गोष्टी चांगल्या होतात तेव्हा रोनाल्डो चांगला आहे आणि जेव्हा वाईट होतात तेव्हा तो निवृत्त झाला आहे, असे म्हटले जाते. हा एक आव्हानात्मक आठवडा होता, मात्र आम्ही मैदानावर उत्तर दिले.
रोनाल्डो

६ - सहा विश्वचषकात गोल करणारा रोनाल्डो पहिलाच खेळाडू ठरला. रोनाल्डोने २००६, २०१०, २०१४ व २०२२च्या विश्वचषकात प्रत्येकी एक, २०१८च्या विश्वचषकात चार आणि सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात दोन असे एकूण १० गोल केले आहेत.

१० - पोर्तुगालसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डोने अग्रस्थान पटकावताना माजी खेळाडू युसेबियो यांच्या (९ गोल) विक्रमास मागे टाकले.

४१ - रोनाल्डो हा विश्वचषकात गोल करणारा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. रोनाल्डोचे सध्याचे वय ४१ वर्षे, १३८ दिवस इतके आहे. १९९४मध्ये कॅमेरूनच्या रॉजर मिल्ला यांनी ४२ वर्षे, ३९ दिवस इतके वय असताना गोल नोंदवला होता.

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास

लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार; बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय

यंदाची आषाढी वारी जगभर पोहोचणार; डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’