X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : ओयारझबालची कमाल; स्पेनची धमाल

मिकेल ओयारझबालने केलेल्या दोन प्रेक्षणीय गोलच्या जोरावर स्पेनने गुरुवारी रात्री ऑस्ट्रियाला ३-० अशी धूळ चारली. या विजयासह स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Swapnil S

इंगलवूड : मिकेल ओयारझबालने केलेल्या दोन प्रेक्षणीय गोलच्या जोरावर स्पेनने गुरुवारी रात्री ऑस्ट्रियाला ३-० अशी धूळ चारली. या विजयासह स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

२०१० मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर बाद फेरीच्या सामन्यात स्पेनने मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला आहे. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात पेड्रो पोरो याने स्पेनसाठी तिसरा गोल केला. या संपूर्ण सामन्यात स्पेनने चेंडूवर नियंत्रण राखत उत्कृष्ट आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. गोल केल्यानंतर ओयारझबालने चेंडू टीशर्टच्या आत लपवून केलेले सेलिब्रेशनही चर्चेत आहे.

स्पेनने यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही गोल स्वीकारलेला नाही. ऑस्ट्रियाला या सामन्यात एकही अचूक शॉट मारता आला नाही, त्यामुळे स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमोन याला एकही बचाव करावा लागला नाही. सिमोनने सलग चौथ्या सामन्यात आपली गोलपोस्ट सुरक्षित ठेवली. म्हणजेच ५१९ मिनिटे त्याने यशस्वी बचाव केला आहे. “संघाला पुढच्या फेरीत नेण्यासाठी मदत करू शकलो याचा आनंद आहे. हा सामना कठीण होता, पण आमचा दिवस चांगला होता आणि आम्ही उत्तम खेळ केला”, असे ओयारझबाल म्हणाला. स्पेनचा पुढील सामना सोमवारी डॅलस येथे पोर्तुगालशी होईल.

सोफाय स्टेडियमवर उपस्थित असलेल्या स्पॅनिश समर्थकांनी बार्सेलोनाचा १८ वर्षीय खेळाडू लॅमिन यमाल याला मोठा प्रतिसाद दिला. यमालने स्पेनच्या एकूण १० शॉट्सपैकी ४ शॉट्स मारले. सामन्याच्या ८५व्या मिनिटाला मैदाबाहेर जाण्यापूर्वी त्याने उत्कृष्ट खेळ केला. ऑस्ट्रियाचा बचावपटू डेव्हिड अलाबा याने यामालचा एक वेगवान शॉट गोललाईनवरून यशस्वीरीत्या रोखला. स्पेनसाठी रिअल सोसिदादचा कर्णधार ओयारझबाल याने सामन्याच्या ३६व्या आणि ८९व्या मिनिटाला गोल करत विजय निश्चित केला. त्याला मार्क कुकुरेला याने दोन्ही गोलसाठी पास देऊन मदत केली.

ऑस्ट्रियाचा गोलरक्षक अलेक्झांडर श्लेजर याने ६ महत्त्वाचे बचाव करत उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रियाने १९९८ नंतर पहिल्यांदाच बाद फेरी गाठली होती, मात्र १९५४ नंतर त्यांना बाद फेरीत एकही विजय मिळवता आलेला नाही. प्रशिक्षक राल्फ रॅगनिक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रियाचे आव्हान आता संपुष्टात आले आहे.

गट साखळीत अपराजित राहिल्यानंतर स्पेनने आता खऱ्या अर्थाने विजेतेपदाच्या शर्यतीत पुनरागमन केले आहे. गेल्या तीन विश्वचषकात स्पेनला लवकर बाहेर पडावे लागले होते. मार्च २०२३ पासून स्पेनचा संघ सलग ३५ स्पर्धात्मक सामन्यांमध्ये अपराजित आहे.

स्पेनने २०१० नंतर प्रथमच म्हणजेच १६ वर्षांनी विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामना जिंकला. २०१४मध्ये ते साखळीतच गारद झाले होते. तर २०१८ व २०२२मध्ये त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा मात्र स्पेनचा संघ उत्तम लयीत असून त्यांना जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. मुख्य म्हणजे त्यांनी यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकाही लढतीत प्रतिस्पर्धीला गोल करू दिलेला नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके