स्वित्झर्लंडची कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडची कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

रुबेन व्हर्गासने पेनल्टी शूटआऊटमध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने कोलंबियाचा ४-३ असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

मियामी : रुबेन व्हर्गासने पेनल्टी शूटआऊटमध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने कोलंबियाचा ४-३ असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मंगळवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. आता आगामी शनिवारी मिसूरी येथील अ‍ॅरोहेड स्टेडियमवर स्वित्झर्लंडचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. अर्जेंटिनाने इजिप्तचा ३-२ असा पराभव करून आधीच उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे.

वँकुव्हर येथील बीसी प्लेस स्टेडियमवर ५२,४९७ प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना रंगला, ज्यात कोलंबियाच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय होती. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा बचावपटू डॅविन्सन सँचेझचा प्रयत्न गोलपोस्टच्या वरच्या पट्टीला लागला, तर स्वित्झर्लंडचा गोलरक्षक ग्रेगोर कोबेलने कुचो हर्नांडेझचा गोल करण्याचा प्रयत्न उत्कृष्टपणे रोखला. सामना पाहण्यासाठी 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल' ('फिफा') चे अध्यक्ष गियानी इन्फँटिनो उपस्थित होते. गोलरक्षक कोबेल म्हणाला की, कोलंबियाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा होता, ज्यामुळे हा सामना आमच्यासाठी कठीण होता, परंतु आम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहून उत्कृष्ट बचाव केला.

स्वित्झर्लंडने १९५४ मध्ये स्वतःच्या देशात झालेल्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात जर्मनीच्या 'फ्रीबर्ग' क्लबसाठी खेळणारा २० वर्षांचा तरुण मध्यरक्षक जोहान मॅन्झाम्बी सरावादरम्यान जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. त्याने या स्पर्धेत ३ गोल केले आहेत. स्वित्झर्लंडचे प्रशिक्षक मुरत याकिन यांनी सांगितले की, संघाने खूप मेहनत घेतली असून अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आणि उत्सुक आहोत. कोलंबियाचा मध्यरक्षक जॉन याने देशाने दाखवलेल्या विश्वासामुळे पराभवाचे दुःख अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली. सामन्यात कोलंबियाच्या गुस्तावो पुएर्ता आणि झ्हॉन लुकुमी यांना गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या, मात्र स्वित्झर्लंडच्या बचावापुढे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांना पराभव पत्करावा लागला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके