क्रीडा

दुखापतीमुळे हर्षित राणा T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर? कॅप्टन सूर्याने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला- "अद्याप त्याला वगळलेले नाही, पण...

T20 World Cup 2026: "गेल्या एक-दोन वर्षांत कोणत्या वेगवान गोलंदाजांनी खरोखर चांगली कामगिरी केली आहे, हे आम्ही पाहू. कोणता गोलंदाज फलंदाजीही करू शकतो, हे देखील बघू. पण, त्याला चांगली फलंदाजी यायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कारण, जर तुम्ही नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावरील खेळाडूने येऊन षटकार मारावा अशी अपेक्षा करत असाल, तर मग पहिल्या आठ फलंदाजांचा काय उपयोग?"

Krantee V. Kale

नवी मुंबई : T20 वर्ल्डकप सुरू व्हायला २४ तासांहून कमी वेळ शिल्लक असताना टीम इंडियाच्या तयारीला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा सराव सामन्यात जखमी झाला असून त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात झालेल्या वॉर्म-अप सामन्यात हर्षितला दुखापत झाली.

सराव सामन्यात हर्षित दुखापतग्रस्त

२४ वर्षीय हर्षितने सामन्यात केवळ एक षटक टाकले. त्या षटकात त्याने १६ धावा दिल्या. गोलंदाजी करताना दोन वेळा रन-अप अर्धवट सोडला. त्यानंतर गुडघा पकडत तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा गोलंदाजीसाठी परतलाच नाही. सामन्यानंतर तो मांडीवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत चिंता वाढली आहे. परिणामी भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

हर्षितला अजून वर्ल्डकपमधून वगळलेले नाही, पण...

शनिवारी अर्थात उद्या भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज (दि.६) झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने हर्षित राणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “हर्षितला अजून वर्ल्डकपमधून वगळलेले नाही. फिजिओ त्याची तपासणी करत आहेत. आजच अंतिम निर्णय कळेल. पण सध्या स्थिती फारशी समाधानकारक वाटत नाही.” असे सूर्याने सांगितले.

...तर त्याची उणीव जाणवेल, निश्चितच मोठा धक्का - सूर्यकुमार

पुढे बोलताना, "काळजी करू नका, उद्यासाठी आमच्याकडे ११ खेळाडू आहेत," असे सूर्यकुमार हसत म्हणाला. "पण हा निश्चितच एक मोठा धक्का आहे, कारण १५ खेळाडूंचा संघ निवडताना अनेक संयोजनांचा विचार केला जातो. हर्षित उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य कॉम्बिनेशनवर काम करू. आमच्याकडे पर्यायांची कमतरता नाही. पण तो नसेल, तर त्याची उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल.”

अन्य पर्यायांवर विचार सुरू असल्याचे दिले संकेत

हर्षित उपलब्ध न झाल्यास अन्य पर्यायांवरही विचार सुरू असल्याचे संकेत कर्णधाराने दिले. "गेल्या एक-दोन वर्षांत कोणत्या वेगवान गोलंदाजांनी खरोखर चांगली कामगिरी केली आहे, हे आम्ही पाहू," असे सूर्यकुमार म्हणाला. "तसेच, कोणता गोलंदाज फलंदाजीही करू शकतो, हे देखील बघू", असे त्याने सांगितले. "पण, त्याला चांगली फलंदाजी यायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कारण, जर तुम्ही नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावरील खेळाडूने येऊन षटकार मारावा अशी अपेक्षा करत असाल, तर मग पहिल्या आठ फलंदाजांचा काय उपयोग? आमच्याकडे काही पर्याय आहेत, त्यापैकी सर्वोत्तम खेळाडूची निवड करू." असे सूर्याने स्पष्ट केले. हर्षित ऐवजी मोहम्मद सिराजची वर्णी लागू शकते असे वृत्त काही माध्यमांनी दिले असले तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

वॉशिंग्टन सुंदरवरच्या दुखापतीवरही लक्ष, पण तिलकमुळे टेन्शन कमी

दरम्यान, हर्षितच्या फिटनेसवर नजर ठेवली जात असतानाच अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीवरही संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत तो साईड स्ट्रेनमुळे खेळू शकला नव्हता, मात्र वर्ल्डकपसाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे तिलक वर्माने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन केले आहे. सराव सामन्यात त्याने अवघ्या १९ चेंडूंमध्ये ४५ धावांची खेळी करत प्रभाव टाकला, तसेच गोलंदाजीतही किफायतशीर षटक टाकले. T20 वर्ल्डकपच्या तोंडावर हर्षित राणाच्या दुखापतीमुळे भारतीय संघात काय बदल होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड