नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज हेनरिच क्लासेनने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायकरित्या निवृत्ती जाहीर केली. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला.
३३ वर्षीय क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ६० एकदिवसीय व ५८ टी-२० सामने खेळले. विशेषत: एकदिवसीय व टी-२०मध्ये क्लासेनची फलंदाजी अधिक धोकादायी होती. २०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताविरुद्ध त्याने जवळपास आफ्रिकेला विजय मिळवून दिला असता. एकदिवसीय प्रकारात क्लासेनने चौथ्या अथवा पाचव्या स्थानी फलंदाजी करताना ६० सामन्यांत ४ शतकांसह ४३च्या सरासरीने २,१४१ धावा केल्या. आता क्लासेन फक्त जगभरातील फ्रँचायझी टी-२० व टी-१० लीगमध्ये खेळताना दिसेल.
दुसरीकडे ३६ वर्षीय मॅक्सवेल आता फक्त ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघातून खेळताना दिसेल. १४९ एकदिवसीय सामन्यांत मॅक्सवेलने ३,९९० धावा करताना २३ अर्धशतके व ४ शतकांसह १२६च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध एक पाय जायबंदी असतानाही नाबाद २०१ धावांची ‘न भूतो, न भविष्यती’ अशी खेळी साकारली. आता २०२६च्या टी-२० विश्वचषकावर मॅक्सवेलच्या नजरा आहेत. मात्र या दोघांच्या निवृत्तीमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे, हे निश्चित.