हॉकी इंडियातील अंतर्गत वादाला नवे वळण; अध्यक्ष दिलीप तिर्कीकडून महासंचालक आर. के. श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस (Photo-X)
क्रीडा

हॉकी इंडियातील अंतर्गत वादाला नवे वळण; अध्यक्ष दिलीप तिर्कीकडून महासंचालक आर. के. श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस

हॉकी इंडियाने आपले महासंचालक कमांडर आर. के. श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांचे सर्व अधिकार तत्काळ प्रभावाने काढून घेतले.

Swapnil S

नवी दिल्ली: हॉकी इंडियाने आपले महासंचालक कमांडर आर. के. श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांचे सर्व अधिकार तत्काळ प्रभावाने काढून घेतले. भारतीय संघाच्या विश्वचषकातील जर्सी बदलाचा वाद हा त्यांच्यावरील आठ आरोपांपैकी प्रमुख आरोप आहे.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी आपल्या वकिलामार्फत श्रीवास्तव यांना ही नोटीस पाठवली. त्यात त्यांच्यावर आठ आरोप ठेवण्यात आले असून, नोटीस मिळाल्यापासून चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत उत्तर न दिल्यास उपलब्ध नोंदींच्या आधारे प्रकरण पुढे नेऊन सक्षम प्राधिकरणाकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

"हॉकी इंडियाचे महासंचालक म्हणून आपले सर्व अधिकार तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात येत आहेत. हॉकी इंडियाच्या उपनियमांनुसार पुढील निर्णय होईपर्यंत आपण कोणतेही अधिकार वापरू नयेत किंवा हॉकी इंडियाच्या वतीने कोणतीही कृती करू नये," असे नोटिशीत म्हटले आहे.

हॉकी इंडियामध्ये शिस्त, उत्तरदायित्व, पारदर्शकता, नोंदींचे संरक्षण आणि संस्थेचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी अध्यक्षांच्या वतीने हा निर्देश देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, हा आदेश श्रीवास्तव यांना आपले म्हणणे मांडण्याच्या अधिकारावर परिणाम करणारा नसून, उपनियमांनुसार पुनर्विचार, बदल किंवा नवीन आदेश होईपर्यंत लागू राहील, असे नोटिशीत नमूद आहे.

श्रीवास्तव यांना संस्थेचे कार्यकारी कामकाज, अधिकृत नोंदी, कागदपत्रे, फाइल्स, प्रवेशाचे तपशील, मालमत्ता आणि प्रलंबित विषय अध्यक्ष कार्यालयाने नियुक्त केलेल्या अधिकारी किंवा व्यक्तीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच हॉकी इंडियाच्या वतीने कार्यकारी, प्रशासकीय, आर्थिक, करारविषयक, पर्यवेक्षकीय, स्वाक्षरी, मंजुरी, शिस्तभंगविषयक, माध्यम, संवाद किंवा प्रतिनिधित्वाचे कोणतेही अधिकार वापरू नयेत, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. सर्व भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक अधिकृत नोंदी जतन करण्याचे आणि त्यामध्ये बदल करणे, त्या हटवणे, नष्ट करणे, हस्तांतरित करणे, लपवणे किंवा काढून टाकणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जर्सी बदलाचा निर्णय वादाच्या केंद्रस्थानी

श्रीवास्तव यांच्यावरील प्रमुख आरोप भारतीय राष्ट्रीय संघाच्या खेळाच्या जर्सीशी संबंधित आहे. पारंपरिक निळ्या रंगाची जर्सी बदलून नारंगी रंगाची जर्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दृश्यमानतेच्या कारणास्तव हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला. अध्यक्ष किंवा कार्यकारी समितीशी पूर्वी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय संघांच्या जर्सीमध्ये बदल करून ती सार्वजनिकरीत्या सादर करण्यात आल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.

विश्वचषकासाठी परदेश दौऱ्यावरही आक्षेप

विश्वचषकासाठी नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे जाण्याच्या श्रीवास्तव यांच्या निर्णयावरही नोटिशीत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हॉकी इंडिया लीग (एचआयएल) आणि इतर प्राधान्याच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतातच राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. "कमांडर आर. के. श्रीवास्तव यांनी विश्वचषकासाठी प्रवास करू नये, कारण एचआयएल आणि तातडीने सोडवण्याची आवश्यकता असलेल्या इतर प्राधान्याच्या विषयांवर त्यांचे पूर्ण लक्ष आवश्यक आहे," असे निर्देश देण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, निवड समितीच्या सदस्या सुभद्रा प्रधान तसेच वयोगटाचे प्रशिक्षक राणी आणि सरदार सिंह यांना संस्थात्मक कामांसाठी पाठवण्याचे निर्देश असतानाही ते स्वतः विश्वचषकासाठी गेल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण, गोदावरी घाटावर भाविकांची अलोट गर्दी

फ्लोटिंग होर्डिंग्जच्या प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका; तरंगत्या जाहिरात फलकामुळे सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; बाथरूममध्ये पडल्याने राहत्या घरात दुर्दैवी अंत

नवी मुंबईतील एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल; सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याची बाजी, हवामानातील बदलांमुळे चिंता कायम

Mumbai : लैंगिक पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय अव्वल; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया यशस्वी