नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी भारतातील क्रीडारत्नांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी नेमबाज मनू भाकर, पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, जगज्जेता बुद्धिबळपटू डी. गुकेश या चौघांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचा नेमबाज आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसळेला यावेळी अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच एकूण ३२ खेळाडूंची यावेळी अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय नेमबाजीतील प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पहिले सुवर्ण जिंकणारे जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचाही यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चंदिगडला वर्षातील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला.