क्रीडा

ICCचा निर्णय अंतिम! पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमारचे वक्तव्य

पाकिस्तानविरुद्ध आम्ही सामना खेळण्यासाठी कोलंबोला नक्कीच जाणार आहोत. बीसीसीआय, आयसीसी व केंद्र शासनाकडून आम्हाला तूर्तास तेच आदेश आहेत. त्यामुळे याबाबतीत अंतिम निर्णय त्यांचाच असेल, असे भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला.

Swapnil S

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध आम्ही सामना खेळण्यासाठी कोलंबोला नक्कीच जाणार आहोत. बीसीसीआय, आयसीसी व केंद्र शासनाकडून आम्हाला तूर्तास तेच आदेश आहेत. त्यामुळे याबाबतीत अंतिम निर्णय त्यांचाच असेल, असे भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला.

भारताविरुद्ध आगामी टी-२० विश्वचषकातील सामना न खेळल्यास पाकिस्तानला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) याविषयी अखेरची ताकीद दिली आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मतावर ठाम राहत भारताविरुद्ध न खेळण्याचे ठरवले आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला याविषयी विचारण्यात आले.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाही टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. पाकिस्तानने रविवारीच विश्वचषकात आपण खेळणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी भारताविरुद्धची लढत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

आयसीसीला जागतिक स्पर्धेत सर्वाधिक महसूल हा भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मिळतो. पाकिस्तानने ही लढत न खेळल्यास आयसीसी त्यांना स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर देखील करू शकते. तसेच पाकिस्तानला प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्स समूहाला नुकसानभरपाई द्यावी लागेल. बांगलादेशप्रमाणेच त्यांच्यावरही द्विराष्ट्रीय मालिकांवर निर्बंध येतील. पाकिस्तान सुपर लीगमध्ये विदेशी खेळाडूंना खेळण्यास आयसीसी मनाई करू शकते. त्यामुळे एकूणच आयसीसीचे न ऐकल्यास पाकिस्तानला मोठा फटका पडू शकतो.

दरम्यान, या स्पर्धेतून बांगलादेशने आधीच माघार घेतली आहे. त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे आयपीएल २०२६च्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात कोलकाता संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी इतकी बोली लावून खरेदी केले. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असणाऱ्या अत्याचाराविरोधात तेथील खेळाडूंना आयपीएलमध्ये घेऊ नये, या मागणीने जोर धरला. परिणामी बीसीसीआयला आठवडाभरातच याची दखल घ्यावी लागली व त्यांनी रहमानला संघातून काढण्याचे आदेश कोलकाताला दिले. कोलकातानेदेखील देशभावना समजून हा निर्णय मान्य केला.

या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने मात्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारतात होणारे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याची भीती दर्शवली. तेव्हाही आयसीसीने बांगलादेशच्या खेळाडूंना, तेथील चाहत्यांना किंवा पत्रकारांना भारतात धोका नसेल, याची हमी दिली. तसेच ठराविक वेळेत निर्णय न घेतल्यास बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा विश्वचषकात समावेश केला जाईल, असेही स्पष्ट केले.

अखेरीस बांगलादेश निर्णयावर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांची गच्छंती केली. यामुळे बांगलादेश क्रिकेटचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच यापुढील आयसीसी स्पर्धा व द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये त्यांना आणखी मानहानी सहन करावी लागू शकते. पाकिस्तानने बांगलादेशचे सामने त्यांच्या येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. तसेच बांगलादेशची हकालपट्टी झाल्यामुळे पाकिस्ताननेही आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून माघार घेण्याचे संकेत दिले होते. तूर्तास ते विश्वचषकात खेळणार आहेत. मात्र आयसीसीने ताकीद दिल्यावरही पाकिस्तानने नकार दिला, तर त्यांना नक्कीच मोठा धोका उद्भवू शकतो.

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस