कोलकाता : होळीच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाने रविवारी विजयी धुळवूड साजरी केली. संजू सॅमसनने (५० चेंडूंत नाबाद ९७ धावा) साकारलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर टी-२० विश्वचषकातील सुपर-आठ फेरीच्या निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. आता गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताची इंग्लंडशी गाठ पडेल.
ईडन गार्डन्सवर झालेल्या सुपर-आठ फेरीतील या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले १९६ धावांचे लक्ष्य भारताने १९.२ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सॅमसनने १२ चौकार व ४ षटकारांसह यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक साकारताना टीकाकारांची तोंडे बंद केली. त्याचे हे एकंदर कारकीर्दीतील चौथे अर्धशतक ठरले. एका बाजूने विकेट पडत असताना सॅमसनला तिलक वर्माची (१५ चेंडूंत २७) उपयुक्त साथ लाभली. गोलंदाजीत जसप्रीत बुमरानेही (२ बळी) नेहमीप्रमाणे मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच भारताने सुपर-आठ फेरीत पहिल्या गटात दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. सॅमसनने विजयानंतर केलेले सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या गटात सलग तीन विजयांसह अग्रस्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती. भारत या गटात दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे आता ४ मार्च रोजी आफ्रिकेसमोर कोलकाता येथे न्यूझीलंडचे आव्हान असेल. तर ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडशी मुकाबला होईल. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१०), इशान किशन (१०), कर्णधार सूर्यकुमार यादव (१८) स्वस्तात बाद झाले. मात्र संजूने तिलकच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४२ धावांची भर घातली. हीच भागीदारी निर्णायक ठरली. तिलक बाद झाल्यानंतरही संजू मैदानात कायम राहिला व भारतासाठी विजयी चौकार लगावूनच परतला.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले होते. आता उपांत्य फेरीकडे लक्ष असेल.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना विंडीजकडून जेसन होल्डर (नाबाद ३७), रोवमन पॉवेल (नाबाद ३४) व रॉस्टन चेस (४०) यांनी चांगली फलंदाजी केली. बुमराने धोकादायक शिम्रॉन हेटमायर व चेस यांचे बळी मिळवले. तसेच शर्फेन रुदरफोर्ड यावेळी अपयशी ठरला. तरीही १९० धावांपलीकडे विंडीजने मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ४ बाद १९५ (रॉस्टन चेस ४०, जेसन होल्डर नाबाद ३७, रोवमन पॉवेल नाबाद ३४; जसप्रीत बुमरा २/३६) पराभूत वि.
भारत : १९.२ षटकांत ५ बाद १९९ (संजू सॅमसन नाबाद ९७, तिलक वर्मा २७; शामर जोसेफ २/४२)
सामनावीर : संजू सॅमसन
उपांत्य फेरी
दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड - बुधवार, ४ मार्च (कोलकाता)
भारत वि. इंग्लंड - गुरुवार, ५ मार्च (मुंबई)
अंतिम सामना : रविवार, ८ मार्च