क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : फलंदाजांचा विक्रमी धुमाकूळ! भारताकडून झिम्बाब्वे चीतपट; अभिषेक, हार्दिक, तिलक यांची फटकेबाजी

अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव केला आणि विजयपथावर परततानाच आव्हान कायम राखले.

Swapnil S

चेन्नई : अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव केला आणि विजयपथावर परततानाच आव्हान कायम राखले. अभिषेक शर्मा (३० चेंडूंत ५५ धावा), हार्दिक पंड्या (२३ चेंडूंत नाबाद ५०) आणि तिलक वर्मा (१६ चेंडूंत नाबाद ४४) यांनी शानदार फटकेबाजी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता रविवारी भारत-वेस्ट इंडिज या लढतीतील विजेता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या विश्वचषकातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच भारतानेही प्रथमच विश्वचषकात इतकी धावसंख्या उभारली. एकंदर टी-२० विश्वचषकाचा इतिहास पाहता ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. श्रीलंकेने २००७मध्ये केनियाविरुद्ध २६० धावा केल्या होत्या. तो विक्रम अद्याप अबाधित आहे. भारतीय फलंदाजांनी तब्बल १७ षटकार लगावले, हा देखील एक विक्रमच. एकूणच आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ आता पुन्हा विजयपथावर परतला आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ब्रायन बेनेटने ५९ चेंडूंत नाबाद ९७ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र अर्शदीप सिंगने ३, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल व शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ बळी मिळवून झिम्बाब्वेला रोखले. सलग दुसऱ्या पराभवामुळे झिम्बाब्वेचे आव्हान संपुष्टात आले. तर भारताने सुपर-आठ फेरीतील पहिला विजय नोंदवला. त्यामुळे भारत व वेस्ट इंडिज यांचे २ सामन्यांत २ गुण असून रविवारी त्यांच्यातील विजेता आगेकूच करेल. आफ्रिकेने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका हे संघ आहेत.

भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सलग चार विजय नोंदवले. भारताने सर्वप्रथम वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. मग चौथ्या साखळी लढतीत नेदरलँड्सवर मात करून भारताने विजयी चौकार लगावला.

भारताने या लढतीसाठी संजू सॅमसनला संधी देत सलामीला पाठवले. त्याने २४ धावांचे योगदान देत आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे अभिषेकला स्थिरावण्यासाठी वेळ मिळाला व अभिषेकने पहिले अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार (३३) व इशान किशन (३८) यांनीही उत्तम फटकेबाजी केली. मात्र तिलक व हार्दिक यांनी शेवटच्या पाच षटकांत चौफेर टोलेबाजी करून सर्वांची मने जिंकली. हार्दिकने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साकारले, तर तिलकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत छाप पाडली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ४ बाद २५६ (अभिषेक शर्मा ५५, हार्दिक पंड्या नाबाद ५०, तिलक वर्मा ४४; मापोसा १/४०) विजयी वि.

झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १८४ (ब्रायन बेनेट नाबाद ९७, सिकंदर रझा ३१; अर्शदीप सिंग ३/२४)

सामनावीर : हार्दिक पंड्या

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Solapur : शेअर मार्केटच्या नादाने वाताहात; कर्जबाजारी मुख्याध्यापकाची कुटुंबासह आत्महत्या

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत