छाया सौजन्य : BCCI
क्रीडा

T20 World Cup: सुपर-८ फेरीचे चित्र झाले स्पष्ट; भारताची दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी लढत; बघा संपूर्ण वेळापत्रक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-आठ फेरीतील अखेरचा संघ बुधवारी ठरला. आता २१ फेब्रुवारीपासून चाहत्यांना सुपर-आठ फेरीचा थरार अनुभवायला मिळेल.

Krantee V. Kale

कोलंबो : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-आठ फेरीतील अखेरचा संघ बुधवारी ठरला. सलामीवीर साहिबझादा फरहानने ५८ चेंडूंत नाबाद १०० धावांची तुफानी खेळी साकारल्यामुळे पाकिस्तानने अ-गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नामिबियाचा १०२ धावांनी फडशा पाडला. त्यामुळे पाकिस्तानने सुपर-आठ फेरीतील स्थान पक्के केले. आता २१ फेब्रुवारीपासून चाहत्यांना सुपर-आठ फेरीचा थरार अनुभवायला मिळेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

सुपर-८मध्ये किमान २ सामने जिंकणे गरजेचे

साखळी फेरीच्या अ,ब,क,ड या प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल झाले आहेत. सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. प्रत्येक संघाचे तीन सामने होतील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ३ पैकी किमान २ सामने जिंकणे गरजेचे असेल. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

सुपर आठच्या पहिल्या गटात भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. अ-गटातून भारताने सलग तीन विजयांसह सर्वप्रथम आगेकूच केली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ३ पैकी किमान २ सामने जिंकणे गरजेचे असेल. त्यामुळे एकूणच आता विश्वचषकाचा थरार आणखी वाढणार आहे. पाकिस्तान सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात असून त्यांना श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड यांच्याशी दोन हात करावे लागतील. सुपर-आठ फेरीतही पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतच होणार आहेत.

भारताच्या सुपर-८ फेरीतील लढती

* रविवार, २२ फेब्रुवारीला भारताची सुपर-आठ फेरीतील पहिल्या लढतीत आफ्रिकेशी गाठ पडेल. अहमदाबाद येथे ही लढत होईल.

* मग २६ तारखेला भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेशी होईल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही लढत होईल.

* त्यानंतर १ मार्च रोजी भारताचा वेस्ट इंडिजशी कोलकाता येथे मुकाबला होईल.

भारताच्या सर्व लढती सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. भारताने किमान ३ पैकी २ सामने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठता येईल.

बघा वेळापत्रक

वानखेडेवर वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढत

मुंबईतील चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर सुपर-आठ लढतीचा आनंद लुटता येईल. मात्र ही लढत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील असेल. सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. सुपर-आठ फेरीत भारताचे सामने अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता येथे होतील. त्याशिवाय भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यास, त्यांचा सामना वानखेडेवरच होईल, असे समजते. मात्र पाकिस्तान, श्रीलंका भारतासमोर आले, तर ही लढत कोलंबोत खेळवली जाऊ शकते.

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

FDA ची नजर आता शाळा-कॉलेजच्या कॅंटिनकडे; लवकरच दिसतील परिणाम, तुकाराम मुंढेंचे संकेत

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी