

'३७० रुपयांची बिर्याणी' वादामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला आहे. गुरुग्राममधील त्याच्या शोदरम्यान प्रेक्षक हिमांशू जांग्राने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वेळीच आक्षेप न घेतल्याची कबुली देत प्रणितने नव्या व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि इतर काही जणांविरोधात चौकशी सुरू आहे.
काय म्हटलंय प्रणित मोरेनं?
इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रणित मोरेने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, "गेल्या काही दिवसांपासून मला याबद्दल बोलायचं होतं. तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल, ज्यामुळे माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आणि एका अर्थाने मी त्या टीकेला पात्रही आहे."
"त्या मुलाशी संवाद साधताना त्याने अनेक अपमानास्पद आणि चुकीच्या गोष्टी बोलल्या. मला ते संभाषण तिथेच थांबवता आलं असतं. मी त्याला विरोधही करू शकलो असतो. पण प्रेक्षक त्यावर हसत होते आणि मीही त्या वातावरणात वाहवत गेलो. माझ्याकडून निर्णय घेण्यात मोठी चूक झाली. मी त्याला एक व्यासपीठ दिलं आणि त्यामुळे हा विषय आणखी वाढला," अशी कबुली प्रणितने दिली.
"ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांची माफी मागतो"
या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करत प्रणित म्हणाला, “या सगळ्या प्रकारामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. माझ्याविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत मी पूर्ण सहकार्य करत आहे. पण मला एक संधी द्या. मी स्वतःमध्ये सुधारणा करेन आणि अधिक जबाबदार व्यक्ती म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करेन. हा माझ्यासाठीही एक मोठा धडा आहे. मी माझ्या कामावर, माझ्या कंटेंटवर आणि स्वतःवर काम करणार आहे. भविष्यात तुम्हाला हा बदल निश्चितपणे दिसेल,” असेही त्याने म्हटले.
प्रणित मोरेच्या गुरुग्राम येथील एका शोमधील 'क्राउड वर्क' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाने डेटवर एका महिलेला ३७० रुपयांची बिर्याणी खाऊ घातल्यानंतर त्याबदल्यात शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. संमती, महिलांविषयीचा दृष्टिकोन आणि विनोदाच्या मर्यादा यावर मोठी चर्चा सुरू झाली.
चौकशीचा फास आणखी आवळला
या प्रकरणानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि इतर काही जणांविरोधात अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत प्रणित मोरे आणि हिमांशू यांना नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सेजल पवार प्रकरणावर अद्याप मौन
दरम्यान, प्रणित मोरेच्या शोमधीलच आणखी एका व्हायरल क्लिपमुळे केईएमशी संबंधित डॉ. सेजल पवारही वादात सापडली आहे. वैद्यकीय शिक्षणादरम्यान मृतदेहांच्या गुप्तांगांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून तिच्यावर टीका होत आहे. मात्र या प्रकरणावर प्रणित मोरेने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.