दुबई : मुंबईचा डावखुरा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने बुधवारी आयसीसीच्या जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत थेट सहाव्या स्थानी झेप घेतली. मुंबईच्याच सूर्यकुमार यादवने मात्र या क्रमवारीत दुसरे स्थान टिकवले आहे.
नुकताच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत यशस्वीने ३ सामन्यांतच १४१ धावा फटकावल्या. भारताने ही मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे यशस्वीने चार स्थानांनी झेप घेताना सहावा क्रमांक काबिज केला. यशस्वीच्या नावावर ७४३ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड ८४४ गुणांसह अग्रस्थानी आहे. सूर्यकुमारच्या खात्यात ७९७ गुण आहेत. भारताच्या ऋतुराज गायकवाडची मात्र सहाव्यावरून आठव्या स्थानी घसरण झाली आहे. शुभमन गिलने ७०व्या स्थानावरून ३६वे स्थान पटकावले आहे.
गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा आदिल रशिद ७१८ गुणांसह आघाडीवर आहे. भारताचा एकही गोलंदाज या यादीत अव्वल १० खेळाडूंत नाही. मात्र झिम्बाब्वेविरुद्ध मालिकावीर ठरलेला वॉशिंग्टन सुंदर ७३व्या स्थानी आला आहे. तसेच मुकेश कुमारने ४६वा क्रमांक पटकावला आहे. भारताचा अक्षर पटेल १३व्या स्थानी आहे. अष्टपैलूंमध्ये श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा अग्रस्थानी असून हार्दिक पंड्या या यादीत पाचव्या स्थानी आहे. हार्दिक व अक्षर दोघांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली.