पुणे : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगतदार वळणावर आहे. पहिल्या दोन लढती जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या चौथ्या लढतीत विजय मिळवून मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. तर, या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्याचा पाहुण्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यात प्रामुख्याने भारतीय फलंदाजांसह कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा असतील.
भारतीय संघ मालिकेत अद्यापही २-१ असा आघाडीवर असून तिन्ही लढतींमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. मात्र गेल्या लढतीत धावांचा पाठलाग करताना मैदानात दव न आल्यास भारताचे फलंदाजही अपयशी ठरू शकतात, याचा प्रत्यय आला. त्यामुळे आता गहुंजेत पुन्हा एकदा नाणेफेक जिंकल्यास भारतीय संघ प्रथम गोलंदाजीच घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
भारतासाठी फलंदाजांच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमारने ३ सामन्यांत अनुक्रमे ०, १२, १४ अशा धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मुख्य म्हणजे दुसऱ्या सामन्यात तिलकने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत छाप पाडली होती. तिसऱ्या लढतीत पुन्हा सूर्यकुमार या स्थानी आला. त्यामुळे फलंदाजीचा क्रम सातत्याने बदलण्यात येत आहे. सलामीवीर संजू सॅमसन (२६, ५, ३), हार्दिक पंड्या (३, ७, ४०) यांनाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा मात्र उत्तम लयीत आहेत.
गोलंदाजीचा विचार करता गेल्या लढतीत भारताने अर्शदीप सिंगला विश्रांती देत मोहम्मद शमीला १४ महिन्यांनी पुनरागमनाची संधी दिली. मात्र शमीने ३ षटकांत एकही बळी न घेता २५ धावा दिल्या. अशा स्थितीत अर्शदीप संघात परतण्याची शक्यता आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती या मालिकेत भारतासाठी हुकमी एक्का ठरत असून त्याने आतापर्यंत १० बळी मिळवले आहेत. त्याला रवी बिश्नोई व अक्षर पटेल यांची साथ लाभणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, जोस बटलरच्या इंग्लंडने मालिकेतील आव्हान शाबूत राखले आहे. बेन डकेट व लियाम लिव्हिंगस्टोन यांना सूर गवसल्याने इंग्लंडची चिंता कमी झाली असेल. फिल सॉल्ट व हॅरी ब्रूक यांच्याकडून पाहुण्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे. लेगस्पिनर आदिल रशिद व जोफ्रा आर्चर यांच्यावर इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त आहे. बटलर पुन्हा एकदा छाप पाडण्यास आतुर आहे.
वेळ : सायंकाळी ७ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, हॉटस्टार ॲप