बडोदा : २०२६ या वर्षातील पहिल्याच सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवून नववर्षाची उत्तम सुरुवात केली. विराट कोहली (९१ चेंडूंत ९३ धावा) आणि शुभमन गिल (७१ चेंडूंत ५६ धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला ४ गडी व ६ चेंडू राखून पराभूत केले.
बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने दिलेले ३०१ धावांचे लक्ष्य भारताने ४९ षटकांत गाठले. अनुभवी के. एल. राहुलने (२१ चेंडूंत नाबाद २९) १२ चेंडूंत १२ धावांची गरज असताना क्रिस्टियन क्लार्कला सलग दोन चौकार व एक षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. यासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरा सामना बुधवार, १४ जानेवारी रोजी राजकोट येथे खेळवण्यात येईल.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या शुभमन गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता. तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.
दरम्यान, भारताचा कर्णधार गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. मात्र डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. त्यांनी २१ षटकांत ११७ धावांची सलामी नोंदवली. अखेर हर्षित राणाने प्रथम निकोल्स (६२) व नंतर कॉन्वे (५६) यांना बाद केले. मग ग्लेन फिलिप्स (१२), मिचेल हे (१८), विल यंग (१२) यांना छाप पाडता आली नाही. मात्र अनुभवी डॅरेल मिचेलने ५ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावा फटकावल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. राणा, कृष्णा व सिराजने प्रत्येकी २ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने रोहितला (२६) स्वस्तात गमावले. आक्रमण करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. मात्र विराट व गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. गिलने १७वे, तर विराटने ७८वे अर्धशतक साकारले. गिल बाद झाल्यावर श्रेयसच्या साथीने विराटने तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भर घातली. विराट ५४वे शतक साकारणार असे वाटत असतानाच कायले जेमिसनने त्याचा अडसर दूर केला. मग श्रेयस (४९), रवींद्र जडेजा (४) हेसुद्धा माघारी परतल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली.
मात्र हर्षित राणाने २३ चेंडूंत उपयुक्त २९ धावा केल्या. राहुल व हर्षितने ५ बाद २४२ अशा स्थितीतून ३७ धावांची भर घातली. हर्षित बाद झाल्यावर मग जायबंदी वॉशिंग्टन सुंदरच्या (नाबाद ७) साथीने राहुलने ४९व्या षटकात भारताचा विजय साकारला.
रोहित-विराटचा खास गौरव
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी संपल्यानंतर रोहित आणि विराटचा बडोदा क्रिकेट संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. बडोदा येथे प्रथमच पुरुषांचा एकदिवसीय सामना आयोजित करण्यात आला होता. तसेच रोहित व विराट दोघेही कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना बडोदा येथे पुन्हा सामना कधी खेळण्यास मिळेल, हे सांगता येणार नाही. दोन वर्षात शक्यतो एका स्टेडियमवर एकच द्विराष्ट्रीय मालिकेतील सामना आयोजित केला जातो. त्यामुळेच ३५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने भारतीय क्रिकेटला दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे रोहित-विराट यांना खास गौरवण्यात आले. यावेळी दोघांनीही आपल्या कटआऊटभोवती हस्ताक्षर केले. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा व बीसीसीआयचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दुखापतीमुळे पंत मालिकेबाहेर
भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंत स्नायूंच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर गेला आहे. पंतच्या जागी ध्रुव जुरेलला संघात स्थान लाभले आहे. बडोदा येथे शनिवारी सराव करताना पंतला दुखापत झाली. २८ वर्षीय पंत २०२४मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे. एकदिवसीय प्रकारात भारतीय संघ राहुलला यष्टिरक्षणासाठी प्राधान्य देत आहे. आफ्रिकाविरुद्ध पंत भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान लाभले नाही. आता या मालिकेतूनही बाहेर गेल्यामुळे पंत थेट जून महिन्यातच भारताच्या एकदिवसीय संघात खेळताना दिसू शकतो. भारताच्या कसोटी संघात मात्र पंत पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४९ षटकांत ६ बाद ३०६ (विराट कोहली ९३, शुभमन गिल ५६, श्रेयस अय्यर ४९, हर्षित राणा २९; कायले जेमिसन ४/४९)
न्यूझीलंड : ५० षटकांत ८ बाद ३०० (डॅरेल मिचेल ८४, हेन्री निकोल्स ६२, डेवॉन कॉन्वे ५६; मोहम्मद सिराज २/४०) पराभूत
सामनावीर : विराट कोहली