इंदूर : 'घरच्या मैदानावर आपणच शेर' अशा थाटात मिरवणाऱ्या भारतीय संघासमोर आता मायदेशातच गड राखण्याचे आव्हान असणार आहे. तीन वनडे सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सापडल्यामुळे इंदूर येथील होळकर स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताला नमवून ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्यासाठी पाहुणा न्यूझीलंडचा संघ उत्सुक आहे.
मार्च २०१९पासून भारताने मायदेशातील एकही वनडे मालिका गमावलेली नाही. न्यूझीलंडचा संघ १९८९ पासून द्विपक्षीय मालिकेसाठी भारतात येत आहे. मात्र किवींना एकदाही भारतात वनडे मालिका जिंकता आलेली नाही. आता द्वितीय श्रेणीचा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आलेला असला तरी त्यांना यावेळी ही परंपरा मोडीत काढण्याची संधी मिळाली आहे.
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला आपल्या कारकीर्दीत आणखी एक पराभव स्वीकारावासा वाटत नाही. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली भारताची कामगिरी सध्या ढासळत चालली आहे. गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने मायदेशातील पाच कसोटी सामन्यांची मालिका गमावली, त्यानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा वनडे मालिका गमावली, त्यानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा वनडे मालिका गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली.
राजकोट येथील दुसऱ्या वनडेत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. प्रमुख फलंदाजांचे अपयश तसेच न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाजांसमोर भारताच्या गोलंदाजांनी टाकलेली नांगी यामुळे या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरला. डॅरिल मिचेलचे नाबाद शतक न्यूझीलंडच्या विजयात
महत्त्वपूर्ण ठरले. फिरकी गोलंदाजी खेळून काढण्याच्या भारताच्या क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय फलंदाजीत अफाट अनुभव आणि क्षमता असूनही मधल्या षटकांत ते न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करत आहेत. स्ट्राइक रोटेट न करणे तसेच अवाजवी धोका पत्करणे भारतीय फलंदाजांना महागात पडत आहे.
सलामीवीर रोहित शर्माच्या खराब फॉर्मची चिंता भारताला सतावत आहे. दोन्ही सामन्यांत रोहित लवकर बाद झाल्याने नंतरच्या फलंदाजांवर दडपण येत आहे. विराट कोहलीने पहिल्या वनडेत दमदार कामगिरी केल्यानंतर त्यालाही दुसऱ्या वनडेत मोठी खेळी करता आलेली नाही. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रो-को (रोहित, कोहली) यांना आता पुढील संधी जुलै महिन्यात (इंग्लंड दौरा) मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे 'रो-को'च्या धमाकेदार खेळीचीअपेक्षा चाहत्यांना आहे.
दुसरा एकदिवसीय सामना सहजपणे जिंकल्यामुळे न्यूझीलंडचा संघ आत्मविश्वासात आहे. डॅरिल मिचेलची आक्रमक फलंदाजी आणि त्याला मिळालेली डेवॉन कॉनवेची साथ यामुळे न्यूझीलंडने हा सामना जिंकला. न्यूझीलंडकडे सध्या दमदार गोलंदाजाची वानवा असली तरी खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीचा फायदा उठवत ते भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत आहेत.
संघनिवडीचा पेचप्रसंग
नितीशकुमार रेड्डी आणि आयुष बदोनी यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची, याचा पेचप्रसंग निवड समितीला सोडवावा लागणार आहे. नितीशकुमारला दुसऱ्या वनडेत संधी मिळूनही छाप पाडता आलेली नाही. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी करण्यासाठी दोघेही उपयुक्त असले तरी खेळपट्टीचा विचार करूनच एकाला अंतिम संघात स्थान मिळणार आहे. होळकर स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक असल्यामुळे अर्शदीप सिंगची भूमिका भारताच्या विजयात मोलाची ठरणार आहे. नव्या चेंडूला स्विंग करण्याची क्षमता, यष्ट्यांवर आक्रमक गोलंदाजी करण्याची हातोटी तसेच डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर चेंडू टाकण्याच्या क्षमतेमुळे अर्शदीप सिंगकडून भारताला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्या समावेशामुळे फिरकी गोलंदाजांवरील ताण कमी होणार आहे.
लोकेश राहुलकडून उपयुक्त फलंदाजी
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे लोकेश राहुलचे फलंदाजीतील पाचवे स्थान निश्चित झाले आहे. दुसऱ्या वनडेत नाबाद ११२ आणि पहिल्या वनडेत नाबाद २९ धावा करत त्याने आपले संघातील स्थान भक्कम केले आहे. त्याच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारताला दुसऱ्या वनडेत ७ बाद २८४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. श्रेयस अय्यरला मात्र चौथ्या क्रमांकावर म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, आयुष बदोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.
न्यूझीलंड : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेवॉन कॉनवे, मिचेल हाय, निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जोश क्लार्कसन, झाक फोल्क्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिस्तियन क्लार्क, कायले जेमिसन, जेडन लेनॉक्स, मायकेल राय.