तिरुवनंतपुरम : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे शनिवारी रंगणाऱ्या पाचव्या टी-२० लढतीत विजयी चौकार लगावण्याची भारताला संधी आहे. मात्र सलामीवीर संजू सॅमसनच्या कामगिरीची भारताला चिंता सतावत आहे. त्यामुळे किमान तिरुवनंतपुरम येथे त्याला सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच लढतींनंतर ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
भारताने अनुक्रमे नागपूर, रायपूर, गुवाहाटी येथे झालेल्या लढतींमध्ये किवी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. मात्र चौथ्या लढतीत न्यूझीलंडने बाजी मारली. पहिल्या सामन्यात २३८ धावांचा डोंगर उभारून भारताने ४८ धावांनी विजय मिळवला. मग दुसऱ्या लढतीत २०९ धावांचे लक्ष्य १५.२ षटकांत गाठले. तर तिसऱ्या सामन्यात भारताने किवी गोलंदाजांचा धुव्वा उडवताना १० षटकांतच १५४ धावांचे लक्ष्य सर केले. भारताच्या जवळपास सर्व खेळाडूंनी छाप पाडली आता अखेरच्या लढतीमध्ये भारताकडे खेळाडूंना विश्रांती देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र सॅमसनने चार सामन्यांत एकदाही ३० पेक्षा अधिक धावा केलेल्या नाहीत.