Photo : X
क्रीडा

पाकिस्तानची भारताविरोधात तक्रार; लढतीनंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराजी; सामनाधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी

सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता अखिलाडूवृत्ती दाखवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरोधात तक्रार नोंदवली आहे. तसेच या लढतीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.

Swapnil S

दुबई : सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता अखिलाडूवृत्ती दाखवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरोधात तक्रार नोंदवली आहे. तसेच या लढतीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.

संयुक्त अरब अमिराती येथे सध्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी व २५ चेंडू राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने दिलेले १२८ धावांचे लक्ष्य भारताने १५.५ षटकांत गाठले. फिरकीपटू कुलदीप यादव (१८ धावांत ३ बळी) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला अक्षर पटेल (२ बळी) व सूर्यकुमार (नाबाद ४७ धावा) यांची सुरेख साथ लाभली. मात्र या विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा सध्या सुरू आहे ती भारताने केलेल्या कृतीची.

गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यांची संख्या रोडावली आहे. त्यातच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी खेळू नये, अशी मागणी करण्यात येत होती. त्या हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा मृत्यू झाला. मात्र केंद्र शासनाच्या सल्ल्यानुसार आयसीसी व बहुद्देशीय स्पर्धांमध्ये भारताला पाकिस्तानशी खेळणे बंधनकारक आहे. त्यामुळेच हा सामना खेळवण्यात आला.

या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीशी हातमिळवणी केली नाही. तसेच विजयी फटका लगावल्यानंतरही सूर्यकुमार शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतला. या दोघांनी पंचांसह पाकिस्तान खेळाडूंशीही हस्तांदोलन केले नाही. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानचा खेळाडू सीमारेषेजवळ येत असतानाच भारताचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले व एका सदस्याने दरवाजासुद्धा बंद केला. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू काही क्षण गोंधळलेले दिसले. त्यांचा कर्णधारही सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनसाठी आला नाही.

“पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांनी भारतीय संघाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही या कृतीचा निषेध करतो. याद्वारे भारताने अखिलाडूवृत्ती दाखवली. त्यामुळेच आम्ही सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी कर्णधाराला पाठवले नाही,” असे पीसीबीने म्हटले. तसेच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनीसुद्धा पत्रकार परिषदेत याविषयी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. भारताची आता शुक्रवारी ओमानशी गाठ पडणार आहे.

...आणि ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद

भारताचा सामना संपल्यापासून एक चित्रफित समाज माध्यमांवर फार चर्चेत आहे. सूर्यकुमार व शिवम दुबे विजयानंतर हस्तांदोलन न करता माघारी परतले. तसेच भारताचे खेळाडूही एकमेकांना आलिंगन देत ड्रेसिंग रूममध्ये गेले. यावेळी पाकिस्तानचे खेळाडू गोंधळलेले होते. भारताचे सर्व खेळाडू व प्रशिक्षक ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर एका सदस्याने दरवाजा बंद केला. अनेक जण या कृतीचे कौतुक करत आहे. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला मैदानात योग्य उत्तर दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सामनाधिकारी निशाण्यावर का?

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी झिम्बाब्वेचे ६९ वर्षीय पायक्रॉफ्ट सामनाधिकारी होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केले नाही, असे समजते. तसेच क्रिकेटमध्ये नाणेफेक झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपापसात अंतिम ११ खेळाडूंची यादी लिहिलेला कागद अदलाबदल करतात. मात्र दोन्ही कर्णधारांनी ते केले नाही. सूर्यकुमारने आपला कागद पायक्रॉफ्ट यांच्याकडे सोपवला. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी याविरोधात तक्रार करतानाच पायक्रॉफ्ट यांची उर्वरित स्पर्धेतून गच्छंती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारणार का?

पीसीबीचे अध्यक्ष असलेले मोहसिन नक्वीच सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आहेत. यापूर्वी भारताचे जय शहा या परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र आता जय शहा आयसीसीचे कार्याध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे नक्वी यांना एसीसीचे पद मिळाले. नियनानुसार आशिया चषक विजेत्या संघाला एसीसीच्या अध्यक्षांच्या हस्ते चषक देण्यात येतो. अशा स्थितीत भारताने ही स्पर्धा जिंकली, तर पाकिस्तानच्या नक्वी यांच्याकडून ते चषक स्वीकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

सूर्यकुमार, गंभीर याबाबत काय म्हणाले?

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार व भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दोघांनीही हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित केला. “आम्ही मिळवलेला विजय चांगला होता. आम्ही संघ म्हणून पहलगाम हल्ल्यात जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी हा विजय समर्पित करतो. तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वीरीत्या पार पडल्याने भारताच्या सैन्यदलाचे आभार मानू इच्छितो,” असे गंभीर म्हणाला.

“मला एका विषयावर मत व्यक्त करण्यासाठी हा योग्य मंच आहे, असे वाटते. पहलगाम ह्ल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांसह आम्ही आहोत, हे आम्ही सांगू इच्छितो. त्याशिवाय आजचा विजय हा भारतीय सैन्यदलाला समर्पित करतो. आम्हाला जेव्हाही क्रिकेटच्या माध्यमातून संधी मिळेल, तेव्हा त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करू,” असे सूर्यकुमार म्हणाला.

त्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने हात न मिळवण्यावर भाष्य केले. “आम्ही येथे खेळण्यासाठी आलो आहोत. संपूर्ण संघाने आपले काम केले. सर्वांचा एकमताने हा निर्णय होता. काही गोष्टी या खिलाडूवृत्तीपेक्षाही महत्त्वाच्या असतात. बीसीसीआय व शासनाच्या आदेशानुसार आम्ही खेळण्याचे काम केले. इतकेच मी म्हणू शकतो,” असेही सूर्यकुमारने सांगितले.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल