कोलंबो : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखले. कोलंबो येथे रविवारी झालेल्या साखळी सामन्यात भारताने महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर शानदार विजय नोंदवताना पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. धडाकेबाज अर्धशतक झळकावणारा इशान किशन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सर्व गोलंदाजांची उत्तम साथ लाभली.
सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची आधीपासूनच सर्वांना उत्सुकता लागून होती. पाऊस या लढतीत खलनायक ठरणार का, अशी भीती होती. मात्र प्रत्यक्षात मैदानात भारतीय खेळाडू नायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली. किशनने ४० चेंडूंत ७७ धावांची खेळी साकारली. मग लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १८ षटकांत ११४ धावांतच गारद झाला. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती या गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी मिळवून पाकिस्तानच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले.
सलग तिसऱ्या विजयासह भारताने अ-गटातून सर्वप्रथम आगेकूच करत सुपर-आठ फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानला या स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषकाचा विचार करता भारताचा हा पाकिस्तानवर आठवा विजय ठरला. फक्त एकदाच भारताला त्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. तसेच भारताने एकंदर १७व्या टी-२० सामन्यांत पाकिस्तानला १४व्यांदा धूळ चारली.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
दरम्यान, या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारतीय खेळाडूंनाही संघर्ष करावा लागला. किशनने १० चौकार व ३ षटकारांसह सलग दुसरे अर्धशतक साकारले. मात्र तिलक वर्मा (२४ चेंडूंत २५), सूर्यकुमार (२९ चेंडूंत ३२), हार्दिक (०) यांना फटकेबाजी करता आली नाही. शिवम दुबे (२७) व रिंकू सिंग (नाबाद ११) यांनी अखेरच्या षटकांत केलेली फटकेबाजी कामी आली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र बुमरा आणि कंपनीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. त्यातच कुलदीपला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. बुमराने सलमान व अयूबला माघारी पाठवले. तर हार्दिकने फरहानला बाद करून पाकिस्तानला बॅकफुटवर ढकलले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १७५ (इशान किशन ७७, सूर्यकुमार यादव ३२, शिवम दुबे २७; सय्यम अयूब ३/२५) विजयी वि. g पाकिस्तान : १८ षटकांत सर्व बाद ११४ (उस्मान खान ४४, शाहीन आफ्रिदी नाबाद २३; जसप्रीत बुमरा २/१७, हार्दिक पंड्या २/१६, वरुण चक्रवर्ती २/१७)
सामनावीर : इशान किशन
हस्तांदोलन नाहीच; वातावरण मात्र शांत
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात तीन लढती झाल्या. मात्र भारतीय खेळाडूंनी एकदाही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे यावेळी भारताचे खेळाडू पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणार की नाही, याकडे लक्ष होते. मात्र सूर्यकुमारने नाणेफेकीच्या वेळी त्यांचा कर्णधार सलमान अघाशी हस्तांदोलन केले नाही. तसेच सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी थेट ड्रेसिंग रूममध्ये परतणे पसंत केले.
या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये कोणतीही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली नाही. तसेच आशिया चषकातील लढतीप्रमाणे हातवारेही कोणाकडून झाले नाहीत. भारताने एकप्रकारे सर्व आघाड्यांवर वर्चस्व गाजवून पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.
मे महिन्यात पहलमाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांतील राजकीय संबंध आणखी बिघडले. त्यातच आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतात. भारताचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने दुबईत खेळला. तसेच पाकिस्तानचा संघ आता विश्वचषकातील सर्व सामने श्रीलंकेत खेळत आहे.
भारताने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आठवा सामना जिंकला. फक्त २०२१मध्ये भारताला त्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. अन्यथा २००७मध्ये २ वेळा, तर २०१२, २०१४, २०१६, २०२२, २०२४ व आता २०२६मध्ये एक वेळा भारताने टी-२० विश्वचषकात त्यांना धूळ चारली आहे.