कोलकाता : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर तुम्ही फलंदाजी करूच शकत नाही, असे नव्हते. खेळपट्टी आम्ही सांगितल्याप्रमाणेच योग्य होती. मात्र फलंदाजांकडून निराशा झाली. ते दडपण हाताळू शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केली.
भारताला रविवारी कोलकाता येथील पहिल्या कसोटीत आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताला दुसऱ्या डावात १२४ धावांचा पाठलाग करता आला नाही व ९३ धावांतच संघ गारद झाला. त्यामुळे अनेकांनी खेळपट्टीसह भारतीय फलंदाजांवर ताशेरे ओढले आहेत. तिसऱ्याच दिवशी ही कसोटी निकाली ठरली. गंभीरने मात्र पिच क्युरेटर व खेळपट्टीची पाठराखण केली आहे.
“याच खेळपट्टीवर बव्हुमाने उत्तम फलंदाजी करून दाखवली. तसेच सुंदर व अक्षरनेही प्रतिकार केला. मात्र दडपण हाताळण्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. खेळपट्टी योग्यच होती. आम्हाला खेळपट्टीविषयी काहीही तक्रार नाही. या लढतीत ३८ विकेट्स गेल्या. त्यापैकी २२ फिरकीपटूंनी, तर १६ बळी वेगवान गोलंदाजांनाही मिळवले. त्यामुळे पूर्णपणे फिरकीला पोषक खेळपट्टी होती, असे म्हणणे चुकीचे ठरेल,” असे गंभीर म्हणाला.
“कसोटीत अनेकदा तुम्हाला कौशल्यासह मानसिक कणखरता आवश्यक असते. प्रतिस्पर्धीला तुम्हा तुमच्यावर दबाव बनवण्याची संधी दिली, तर आपोआप तुम्ही पिछाडीवर पडता. पिच क्युरेटरने आमच्या सांगण्यावरूनच खेळपट्टी तयार केली होती. मात्र दुसऱ्या डावात आम्ही फलंदाजीत आणखी सकारात्मकता दाखवणे अपेक्षित होते. आफ्रिकेने दर्जेदार गोलंदाजी करून आम्हाला विचार करण्यास भाग पाडले,” असेही गंभीरने नमूद केले.
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदाच भारताला १३० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यात अपयश आले. यापूर्वी १९९७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ८१ धावांत गारद झाला होता.
भारताने कोलकाता येथे १३ वर्षांनी कसोटी गमावली. यापूर्वी २०१२मध्ये इंग्लंडने भारताला कोलकातामध्ये नमवले होते. ती मालिका भारताने १-२ अशी गमावली होती.