Photo : X (BCCIWomen)
क्रीडा

IND vs SL : विजयी चौकाराची आज संधी; भारतीय महिला संघाची तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेशी चौथी टी-२० लढत

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला आज विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यातील चौथा सामना रंगणार आहे.

Swapnil S

तिरुवनंतपुरम : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला आज विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यातील चौथा सामना रंगणार आहे. उभय संघांतील या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी आधीच घेतलेली आहे. २ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ दीड महिना विश्रांतीवर होता. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

आता महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळला आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताचे २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत पाच टी-२० सामने होणार आहेत. २१ व २३ तारखेला विशाखापट्टणम येथे, तर २६, २८ व ३० डिसेंबरच्या लढती तिरुवनंतपुरम येथे होतील. त्यानंतर ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. मग भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल.

पहिल्या लढतीत भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या बळावर १२१ धावांचा सहज पाठलाग केला, तर दुसऱ्या लढतीत शफाली वर्माने धडाकेबाज अर्धशतक साकारून भारताला दुसरा विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यातही मग शफालीने अर्धशतक साकारले. मात्र वेगवान गोलंदाज रेणुका सिंग भारताच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली. मुख्य म्हणजे भारताने तिन्ही लढतींमध्ये एकदाही श्रीलंकेला १३० धावांपुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे भारताचेच पारडे चौथ्या लढतीसाठीदेखील जड मानले जात आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने विक्रमी ७७वा टी-२० सामना जिंकला. मात्र क्षेत्ररक्षणात नक्कीच सुविधेला वाव आहे.

तिरुवनंतपुरम येथे दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते. येथे आतापर्यंत फक्त पुरुषांचे चार टी-२० सामने झाले होते. शुक्रवारी झालेला तिसरा सामना हा येथे महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच सामना होता. येथे आतापर्यंत तीन वेळा प्रथम फलंदाजी करणारा, तर दोनदा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

श्रीलंकेच्या दृष्टीने ही मालिका निराशाजनक ठरली आहे. आता ते किमान उर्वरित दोन लढती जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटू व अनुभवी गोलंदाज इनोका रणवीरा यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेचा महिला संघ सातत्याने संघर्ष करत असून त्यांनी भारताविरुद्ध गेल्या १२ पैकी १० टी-२० सामने गमावले आहेत. त्यांना एकदिवसीय विश्वचषकातसुद्धा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा असे प्रतिभावान फलंदाज श्रीलंकेकडे आहेत. मात्र एकंदर सांघिक कामगिरी उंचावण्यात ते अपयशी ठरत आहेत.

दरम्यान, महिला संघासाठी लकी ठरलेल्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • उभय महिला संघांत आतापर्यंत २९ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २३, तर श्रीलंकेने फक्त ५ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आलेला आहे.

जेमिमा, शफालीवर फलंदाजीची भिस्त

पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे अर्धशतक झळकावणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज व सलामीवीर शफाली वर्मा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी स्मृती मानधना, हरमनप्रीत असे फलंदाजही भारताच्या ताफ्यात आहेत. भारताने प्रथम फलंदाजी घेतली, तर या दोघींपैकी एकीकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते. भारताकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी लांबलेली आहे. रिचा घोष, अमनजोत कौर यांच्यामध्येही गरजेनुसार फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

रेणुका, दीप्तीवर गोलंदाजीत मदार

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली दीप्ती शर्मा तापामुळे दुसऱ्या सामन्याला मुकली होती. मात्र तिसऱ्या लढतीत तिने ३ बळी मिळवून छाप पाडली. तसेच भारतासाठी १५० बळी मिळवणारी पहिली गोलंदाज ठरण्याचा पराक्रमही केला. काही दिवसांपूर्वीच दीप्तीने जागतिक टी-२० अष्टपैलू क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली. याव्यतिरिक्त रेणुकाने ४ बळी मिळवून सामनावीर पुरस्कार पटकावला. तिला अरुंधती रेड्डीच्या जागी संधी देण्यात आली होती. श्री चरणी व वैष्णवी शर्मा या डावखुऱ्या फिरकीपटूंची जोडी भारताची ताकद आहे. रेणुकाला क्रांती गौडची वेगवान गोलंदाजीत साथ लाभेल. तसेच यष्टिरक्षक गुनालन कमलिनीदेखील प्रतीक्षा करत आहे. एकूणच भारताचा समतोल पाहता त्यांना रोखणे श्रीलंकेला कठीण जाईल.

अटापटू, रणवीराकडून श्रीलंकेला अपेक्षा

श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटू व अनुभवी गोलंदाज इनोका रणवीरा यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेचा महिला संघ सातत्याने संघर्ष करत असून त्यांनी भारताविरुद्ध गेल्या १२ पैकी १० टी-२० सामने गमावले आहेत. त्यांना एकदिवसीय विश्वचषकातसुद्धा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. किमान टी-२० प्रकारात ते कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा असे प्रतिभावान फलंदाज श्रीलंकेकडे आहेत. मात्र सांघिक कामगिरी उंचावण्यात ते अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीनुसार श्रीलंकेला आता कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके