Photo : X (ddsportschannel)
क्रीडा

IND vs WI : यशस्वीचा दीडशतकी नजराणा! पहिल्या दिवसअखेर भारताच्या २ बाद ३१८ धावा; सुदर्शनचे अर्धशतक

मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (२५३ चेंडूंत नाबाद १७३ धावा) शुक्रवारी कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साकारले. त्याला साई सुदर्शनच्या (१६५ चेंडूंत ८७ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (२५३ चेंडूंत नाबाद १७३ धावा) शुक्रवारी कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साकारले. त्याला साई सुदर्शनच्या (१६५ चेंडूंत ८७ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) सुरू असलेल्या या लढतीत भारताने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत २ बाद ३१८ धावांपर्यंत मजल मारली आहे. दीडशतक साकारणारा यशस्वी १७३, तर कर्णधार शुभमन गिल ६८ चेंडूंत २० धावांवर नाबाद आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या दिवशीसुद्धा विंडीजच्या गोलंदाजांना एकेक विकेट मिळवण्यासाठी घाम गाळायला लावणार, यात शंका नाही. तसेच पहिल्या कसोटीप्रमाणे एकच डाव फलंदाजी करून भारतीय संघ विंडीजला दोन वेळा गुंडाळणार का, हे पाहणेसुद्धा रंजक ठरेल.

भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता २५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात प्रथमच कसोटी मालिका खेळत आहे. भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांवरही टीका झाली, तर खेळपट्टीही गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. आता दुसऱ्या कसोटीतही यश संपादन करून क्लीन स्वीप साकारण्यासाठी भारत आतुर आहे. या कसोटीत फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीचा लाभ उचलून भारताने पहिल्या दिवशीच धावांचे शिखर उभारले आहे. भारताने या लढतीसाठी संघात एकही बदल केलेला नाही.

गिलने कर्णधार म्हणून अखेरीस सातव्या कसोटीत नाणेफेक जिंकली व प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २३ वर्षीय यशस्वी व अनुभवी के. एल. राहुल यांच्या जोडीने हा निर्णय योग्य ठरवताना आश्वासक सुरुवात केली. दोघांनी १७ षटकांत ५८ धावांची सलामी नोंदवली. फिरकीपटू जोमेल वॉरिकनने राहुलचा अडसर दूर केला. राहुलने ५ चौकार व १ षटकारासह ५४ चेंडूंत ३८ धावा केल्या. त्यानंतर यशस्वी व सुदर्शन या डावखुऱ्यांची जोडी जमली. दोघांनी उपहारापर्यंत भारताला १ बाद ९४ धावांपर्यंत नेले.

दुसऱ्या सत्रातही या दोघांनी फटकेबाजी कायम राखली. प्रथम यशस्वीने १३वे, तर नंतर सुदर्शनने दुसरे अर्धशतक पूर्ण केले. याच सत्रात मग यशस्वीने कसोटीतील सातवे, तर २०२५ या वर्षातील तिसरे शतक साकारले. यशस्वी व सुदर्शनने चहापानापर्यंत भारताला ५८ षटकांत १ बाद २२० धावांपर्यंत मजल मारून दिली.

तिसऱ्या सत्रात अखेरीस वॉरिकननेच सुदर्शनला ८७ धावांवर पायचीत पकडले. सुदर्शन व यशस्वीने दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार गिलच्या साथीने यशस्वीने भारताला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भर घातली आहे. यशस्वीने २२ चौकारांच्या साथीने कारकीर्दीत पाचव्यांदा १५०हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे शनिवारी त्याला द्विशतक व त्यानंतर त्रिशतक साकारण्याचीही संधी आहे. यामध्ये अन्य फलंदाजांकडूनही योगदान लाभल्यास भारतीय संघ किमान ५०० धावांचा डोंगर उभारू शकतो.

दरम्यान, गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. यावेळी मात्र चित्र बदलले आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९० षटकांत २ बाद ३१८ (यशस्वी जैस्वाल नाबाद १७३, साई सुदर्शन ८७, के. एल. राहुल ३८, शुभमन गिल नाबाद २०; जोमेल वॉरिकन २/६०)

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप