नवी दिल्ली : २०३६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत, जर्मनी, कतार आणि तुर्किये यांच्यासह सात देशांनी उत्सुकता दाखवली आहे. या सर्व देशांना पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) ‘फ्युचर होस्ट कमिशन’समोर त्यांच्या स्पर्धा आयोजनाच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताला सहजासहजी यजमानपद मिळणार नाही, हे स्पष्ट झाले.
आयओसीच्या म्हणण्यानुसार, इच्छुक देशांच्या प्रकल्पांचे विविध तांत्रिक निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये क्रीडा सुविधांचा मास्टर प्लॅन, खेळाडूंना मिळणारा अनुभव, निधी उभारणीची रणनीती, राजकीय आणि जनतेचा पाठिंबा, स्पर्धांचे प्रभावी आयोजन करण्याची क्षमता तसेच यजमान शहर आणि स्थानिक समुदायांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्याची योजना यांचा समावेश आहे. मात्र, प्रकल्प सादरीकरणाची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी, हंगेरी, भारत, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्किये हे सध्या २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी आयओसी सोबत सातत्यपूर्ण चर्चेत आहेत. ३१ ऑक्टोबरनंतर २०३६ साठी कोणत्याही नव्या इच्छुकाचा विचार केला जाणार नसल्याचेही आयओसीने स्पष्ट केले आहे.
भारताने २०२४ मध्ये ऑलिम्पिक आयोजनासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ सादर केले होते. भारताकडून २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतात अद्याप ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन झालेले नाही.
आयओसीच्या अध्यक्षा कर्स्टी कोव्हेंट्री यांनी सांगितले की, कोणत्याही देशाला यजमानपद मिळाले तरी खेळाडूंचा अनुभव हा केंद्रस्थानी असला पाहिजे. खेळाडू अनेक वर्षे ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात आणि स्पर्धेतील त्यांचा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतो, असे त्यांनी नमूद केले.
हे महत्त्वाचे
इच्छुक देश : भारत, जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, तुर्किये
भारताचे प्रस्तावित यजमान शहर : अहमदाबाद
प्रकल्प सादरीकरण : नोव्हेंबर २०२६
नव्या इच्छुकांसाठी अंतिम तारीख : ३१ ऑक्टोबर २०२६
अंतिम निवड प्रक्रिया : २०२८ पासून सुरू
यजमानाची घोषणा : २०२९च्या मध्यात होण्याची शक्यता