भारतासह पाच देशांचे पथक तासभर ताटकळत; आयोजकांमधील समन्वयाअभावी ध्वजारोहण समारंभात गोंधळ (Photo-X)
क्रीडा

भारतासह पाच देशांचे पथक तासभर ताटकळत; आयोजकांमधील समन्वयाअभावी ध्वजारोहण समारंभात गोंधळ

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात शुक्रवारी मोठा सावळागोंधळ पाहायला मिळाला.

Swapnil S

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात शुक्रवारी मोठा सावळागोंधळ पाहायला मिळाला. आशियाई ऑलिम्पिक परिषद (ओसीए) आणि स्थानिक आयोजक समिती यांच्यातील गैरसमज व समन्वयाच्या अभावामुळे भारतीय पथकासह एकूण सहा देशांच्या खेळाडूंना तासभरापेक्षा जास्त वेळ ताटकळत राहावे लागले. अखेर गोंधळाच्या वातावरणातच हा सोहळा पार पडला.

गार्डन पिअर येथे जपानी वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सोहळा सुरू होणार होता. सुरुवातीला २० मिनिटांच्या विलंबाने सोहळ्यास प्रारंभ झाला. मंचावर बँड पथक आणि निंजा योद्ध्यांच्या वेशातील कलाकार सादरीकरणासाठी सज्ज होते. भारताचे पथक प्रमुख सहदेव यादव यांच्यासह उपपथक प्रमुख शरथ कमल, लिजो डेव्हिड थोट्टन, अलकनंदा अशोक आणि अंजली भागवत हेही उपस्थित होते. मात्र, भारत, येमेन, उत्तर कोरिया, पॅलेस्टाईन, चिनी तैपेई आणि तिमोर-लेस्ते या सहा देशांच्या पथकांना मंचावर जाण्यापासून रोखण्यात आले. १५ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर सर्वांना विश्राम कक्षात परत जाण्यास सांगण्यात आले.

‘अनागोक’च्या अधिकाऱ्यांनी एका संघामुळे समस्या निर्माण झाल्याचे सांगत १५ मिनिटांत सोहळा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले व विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हा गोंधळ तासभरापेक्षा जास्त काळ ताणला गेला. या विलंबामागे राजकीय कारण असल्याचे वृत्त पसरल्यानंतर आयोजकांनी स्पष्टीकरण दिले. ओसीए कार्यकारी मंडळ आणि आयोजक समिती यांच्यातील संवादाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तैवानमुळे किंवा कोणत्याही खेळामुळे विलंब झाला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वादाचा दावा फेटाळला.

दीर्घ प्रतीक्षेनंतर जेव्हा ध्वजारोहण सोहळा पुन्हा सुरू झाला, तेव्हा भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माजी नेमबाज अंजली भागवत आणि लिजो थोट्टन मंचावर गेले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनीही सोहळ्याला हजेरी लावली. अशा प्रकारचा गोंधळ मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया सहदेव यादव यांनी दिली.

मनू, तजिंदर उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर यांची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजधारक म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडणार आहे. भारताचे पथक प्रमुख सहदेव यादव यांनी मनू भाकर भारताची ध्वजधारक असेल अशी घोषणा केली. त्यानंतर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने तजिंदरपाल हा दुसरा ध्वजधारक असेल यावर शिक्कामोर्तब केले. मनूने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून नवा विक्रम नोंदवला होता. तर दुसरीकडे तजिंदरपाल याने आशियाई स्पर्धेच्या सलग दोन हंगामात भारतासाठी सुवर्णपदके जिंकलेली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर; न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ, ९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी

Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू; दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’