जडेजाचे पुनरागमन; सारांशला प्रथमच संधी, बुमराबाबत संभ्रम, श्रीलंकेविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर 
क्रीडा

जडेजाचे पुनरागमन; सारांशला प्रथमच संधी, बुमराबाबत संभ्रम, श्रीलंकेविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

मध्य प्रदेशचा ३३ वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर सारांश जैन याला पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच स्थान मिळाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: मध्य प्रदेशचा ३३ वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर सारांश जैन याला पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय निवड समितीने मंगळवारी या मालिकेसाठी १५ सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे, तर तारांकित जसप्रीत बुमराचा मात्र तंदुरुस्ती चाचणीच्या आधारे भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

दुखापतीतून सावरत असलेला अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी असल्याने सारांश जैनला संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. श्रीलंका दौऱ्यात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॅल येथे पहिली कसोटी आणि २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ ७ ऑगस्टपासून चार दिवसांचा सराव सामनाही खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सुंदरच्या अनुपस्थितीत ऑफस्पिनरची गरज होती.

घरगुती क्रिकेटमध्ये १० वर्षांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर सारांशला हे यश मिळाले आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी चषक विजेत्या मध्य प्रदेश संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. भारत-अ संघाच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने दोन सामन्यांत ६ बळी घेण्यासोबतच नाबाद ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. भारतीय संघात जडेजा आणि मानव सुथार हे डाव्या हाताचे फिरकीपटू, तर कुलदीप यादव हा डाव्या हाताचा मनगटी फिरकीपटू आहे. त्यामुळे निवड समितीने वैविध्य म्हणून उजव्या हाताच्या या तज्ज्ञ ऑफस्पिनरला पसंती दिली. जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीतून जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. इतर खेळाडूंच्या बाबतीत बहुतांश संघ अपेक्षेप्रमाणेच आहे. वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने श्रीलंका-अ संघाविरुद्ध एकाच सामन्यात १० बळी घेण्याच्या कामगिरीच्या जोरावर आपले स्थान कायम ठेवले आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज बुमरा आणि फलंदाज साई सुदर्शन यांचा समावेश तंदुरुस्तीच्या अधीन असून संघ श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. बुमरा दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाही, तर विदर्भाचा यश ठाकूर आणि जम्मू-काश्मीरचा आकिब नबी हे पर्याय म्हणून शर्यतीत आहेत.

भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी