मँचेस्टर : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या झुंजार वृत्तीपुढे अखेर इंग्लंडने गुडघे टेकले. कर्णधार शुभमन गिल (२३८ चेंडूंत १०३ धावा), अनुभवी रवींद्र जडेजा (१८५ चेंडूंत नाबाद १०७) आणि प्रतिभावान वॉशिंग्टन सुंदर (२०६ चेंडूंत नाबाद १०१) या तिघांनी रविवारी दमदार शतके साकारली. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला.
ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात ३११ धावांची आघाडी घेतली होती. त्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात तब्बल १४३ षटके फलंदाजी करताना ४ बाद ४२५ धावांपर्यंत मजल मारली. भारताने एकूण ११४ धावांची आघाडीसुद्धा घेतली. जडेजा व सुंदर यांनी अखेरच्या तासात शतके झळकावून इंग्लंडवर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची वेळच येणार नाही, याची खात्री बाळगली. अखेरीस सुंदरचे शतक झाल्यावर दोन्ही संघांतील खेळाडूंनी आपसी सहमतीने सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल २०३ धावांची अभेद्य भागीदारी रचून इंग्लंडला हैराण केले.
चार लढतींनंतर इंग्लंड या मालिकेत २-१ अशी आघाडीवर असून पाचवी लढत ३१ जुलैपासून ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात येईल. मुख्य म्हणजे या मालिकेतील आतापर्यंतच्या चारही लढती पाचव्या दिवसापर्यंत रंगल्या आहेत, हे विशेष. भारतीय संघ ही मालिका जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले असले, तरी ते मालिका बरोबरीत नक्कीच सोडवू शकतात.
दरम्यान, आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे आता युवा शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
मात्र गिल-गंभीर पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. त्यामुळे उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर आहे.
दरम्यान, उभय संघांतील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारताने २ बाद १७४ धावा केल्या होत्या. तेथून पुढे रविवारी पाचव्या दिवसाला प्रारंभ करताना के. एल. राहुल व गिल यांनी नेटाने किल्ला लढवला. मात्र राहुल शतकाच्या जवळ आल्यावर ९० धावांवर बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्सने त्याला पायचीत पकडले. राहुल व गिलने तिसऱ्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी रचली.
गिलने मात्र मालिकेतील चौथे शतक साकारले. त्याने १२ चौकारांसह आपली खेळी सजवली. ऋषभ पंतच्या जागी बढती देण्यात आलेल्या सुंदरनेही त्याला सुरेख साथ दिली. ही जोडी भारताला उपहारापर्यंत सहज घेऊन जाणार असे वाटत होते. मात्र शतक साकारल्यावर जोफ्रा आर्चरने गिलला १०३ धावांवर माघारी पाठवले.
४ बाद २२२ धावांवरून मग जडेजा व सुंदर यांची जोडी जमली. या दोघांनी दुसरे व तिसरे सत्र पूर्ण फलंदाजी केली. मुख्य म्हणजे विकेट मिळत नाही, हे पाहून स्टोक्सने सामना अनिर्णित राखण्यासाठी दोघांना विचारणाही केली. मात्र दोघेही फटकेबाजी करत होते. अखेरीस जडेजाने १३ चौकार व १ षटकारासह कसोटीतील पाचवे शतक साकारले, तर सुंदरने ९ चौकार व १ षटकारासह पहिले कसोटी शतक झळकावून तमाम देशवासियांची मने जिंकली. अखेरीस सुंदरचे शतक झाल्यावर दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातमिळवणी केली. सुंदर व जडेजाने पाचव्या विकेटसाठी तब्बल २०३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या स्टोक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ३५८
इंग्लंड (पहिला डाव) : ६६९
भारत (दुसरा डाव) : १४३ षटकांत ४ बाद ४२५ (रवींद्र जडेजा नाबाद १०७, वॉशिंग्टन सुंदर नाबाद १०१, शुभमन गिल १०३, के. एल. राहुल ९०; ख्रिस वोक्स २/६७)
सामनावीर : बेन स्टोक्स