दुबई : मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय युवा संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विहान मल्होत्रा (४५ चेंडूंत नाबाद ६१ धावा) आणि आरोन जॉर्ज (४९ चेंडूंत नाबाद ५८ धावा) यांनी झळकावलेल्या झुंजार अर्धशतकांच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला ८ गडी व १२ चेंडू राखून धूळ चारली. पावसामुळे उभय संघांतील लढत प्रत्येकी २० षटकांची खेळवण्यात आली.
दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानात झालेल्या या लढतीत श्रीलंकेने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य भारताने १८ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. विहान आणि आरोन या दोघांनाही विभागून सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेशला ८ गडी राखून नमवले.
पुढील वर्षी १५ जानेवारीपासून नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे १९ वर्षांखालील युवांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी आशियाई खंडातील देशांना सराव व्हावा, या हेतूने दुबईत युवा आशिया चषक खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, अमिराती व मलेशिया अ-गटात, तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ ब-गटात आहेत. मुंबईच्या १८ वर्षीय आयुष म्हात्रेकडे या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारताने अ-गटात सलग तीन साखळी सामने जिंकून आगेकूच केली. त्यांनी अनुक्रमे यूएई, पाकिस्तान व मलेशियाचा धुव्वा उडवला. दुसऱ्या गटातून बांगलादेश व श्रीलंका यांनी आगेकूच केली. बांगलादेशने ब-गटात तिन्ही लढती जिंकल्या होत्या. मात्र उपांत्य फेरीत ते पाकिस्तानसमोर निष्प्रभ ठरले. त्यामुळे आता अंतिम फेरीत भारताची पुन्हा पाकिस्तानशी गाठ पडेल. साखळी लढतीत भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केले होते.
दरम्यान, शुक्रवारी पावसामुळे ५० षटकांचा सामना शक्य झाला नाही. परिणामी २० षटकांची लढत खेळवण्यात आली. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ८ बाद १३८ धावा केल्या. वेगवान गोलंदाज हेनिल पटेल व फिरकीपटू कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. कर्णधार विमथ दिनसारा (३२) व चमिका हीनागला (४२) यांनी श्रीलंकेकडून चांगले योगदान दिले. मात्र त्यांना अपेक्षित धावगती वाढवता आली नाही.
मग लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आयुष (७) व १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी (९) यांना स्वस्तात गमावले होते. २ बाद २५ अशी स्थिती असताना आरोन व विहान यांची जोडी जमली. केरळचा १९ वर्षीय आरोन व पटयाळाचा १८ वर्षीय विहान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. आरोनने ४ चौकार व १ षटकारासह अर्धशतकी खेळी साकारली, तर विहानने ४ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे भारताने १८ षटकांत शानदार विजय साकारला. आता रविवारी रंगणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्धच्या महाअंतिम मुकाबल्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ८ बाद १३८ (चमिका हीनागला ४२, विमथ दिनसारा ३२; हेनिल पटेल २/३१) पराभूत वि.
भारत : १८ षटकांत २ बाद १३९ (विहान मल्होत्रा नाबाद ६१, आरोन जॉर्ज नाबाद ५८; रसिथ निमसारा २/२३)