क्रीडा

भारत-पाकिस्तान एकाच गटात! ९ जून रोजी रंगणार पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत

दर दोन वर्षांच्या अंतराने होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा थरार यंदा १ ते २९ जूनदरम्यान रंगणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आणखी एका विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२४साठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. न्यूयॉर्क येथे ९ जून रोजी उभय संघांतील लढत होणार आहे. आयसीसीने शुक्रवारी स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक व गटवारी जाहीर केली. सामन्यांची वेळ मात्र कालांतराने जाहीर करण्यात येईल.

दर दोन वर्षांच्या अंतराने होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा थरार यंदा १ ते २९ जूनदरम्यान रंगणार आहे. २० संघांचा यावेळी विश्वचषकात समावेश करण्यात आला असून त्यांना ४ गटांत विभागण्यात आले आहे. भारतीय संघाला पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका यांच्यासह अ-गटात स्थान लाभले आहे. भारतीय संघ साखळीत तीन सामने न्यूयॉर्क येथे, तर एक लढत फ्लोरिडा येथे खेळणार आहे. ५ जून रोजी भारताची सलामीच्या लढतीत आयर्लंडशी गाठ पडेल. त्यानंतर अनुक्रमे पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा यांच्याशी भारत दोन हात करणार आहे.

१ जून रोजी अमेरिका विरुद्ध कॅनडा लढतीने विश्वचषकाला प्रारंभ होईल. २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम फेरीचा सामना रंगेल. २०२२च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानला नमवले होते. भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

टी-२० विश्वचषकासंबंधी हे महत्त्वाचे

टी-२० विश्वचषकात प्रथमच २० संघ सहभागी होणार असून त्यांना ४ गटांत विभागण्यात आले आहे. २०२२च्या टी-२० विश्वचषकात १६ संघ होते.

स्पर्धेत ६ ठिकाणांवर एकंदर ५५ सामने खेळवण्यात येणार असून प्रथमच अमेरिका येथे विश्वचषकाच्या लढती होणार आहेत.

प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ ‘सुपर-८’ फेरीसाठी पात्र ठरतील.

‘सुपर-८’ फेरीत प्रत्येकी चार संघांचे दोन गट बनवण्यात येतील.

दोन्ही गटातूंन आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

गटवारी

अ-गट : भारत, पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा

ब-गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क-गट : न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, पापुआ न्यू गिनी, युगांडा

ड-गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

भारताचे सामने

दिनांक प्रतिस्पर्धी संघ

५ जून वि. आयर्लंड

९ जून वि. पाकिस्तान

१२ जून वि. अमेरिका

१५ जून वि. कॅनडा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी