नवी दिल्ली : सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतही विजय धडाका कायम राखला आहे. रविवारी चीनला ३-० असे नमवल्यावर सोमवारी भारताने जपानचा ५-१ असा धुव्वा उडवला. सुखजीत सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया असे सहा संघ सहभागी झाले आहेत. भारतानेच आतापर्यंत सात पर्वांपैकी चार वेळा विजेतेपद मिळवले असल्याने यंदाही त्यांचे पारडे जड मानले जात आहे. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर नव्या अभियानाला प्रारंभ करताना भारताने सलामीच्या लढती चीनला नमवले. गतविजेत्या भारतासाठी सुखजीत (१४वे मिनिट), उत्तम सिंग (२७वे मि.) आणि अभिषेक (३२वे मि.) यांनी गोल केले. गतविजेते आणि ऑलिम्पिकमधील सलग दुसरे कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात एक वेगळाच उत्साह दिसत होता. आपण गतविजेते का आहोत हे दाखवून देताना भारतीय खेळाडूंनी चालून आलेल्या प्रत्येक संधीचे सोने केले.
पूर्वार्धातील पहिल्या सत्रात सुखजितने भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या अखेरीस उत्तम सिंगने दुसरा गोल करून विश्रांतीला भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धाला सुरुवात झाल्यावर दोन मिनिटांतच अभिषेकने रिव्हर्स फ्लिकने नेत्रदीपक गोल करून भारताची आघाडी भक्कम केली. भारताच्या बचावफळीने सर्वोत्तम कामगिरी करताना चीनला गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही.
त्यानंतर सोमवारी झालेल्या लढतीतही सुखजीतने लक्ष वेधले. त्याने दुसऱ्या व ६०व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले, तर अभिषेक (तिसरे मिनिट), संजय (१७वे) आणि उत्तम सिंग (५४वे) यांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवून सुखजीतला सुरेख साथ दिली. जपानकडून कुझुमासाने एकमेव गोल केला. मंगळवारी विश्रांतीचा दिवस असून बुधवारी होणाऱ्या सामन्यात भारतासमोर मलेशियाचे आव्हान असेल.
सलग दोन विजयांच्या सहा गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. प्रत्येक संघ पाच लढती खेळणार असून आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.