IND vs SA : रोहित-कोहलीची परीक्षा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका आजपासून X (BCCI)
क्रीडा

IND vs SA : रोहित-कोहलीची परीक्षा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका आजपासून

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. नियमित कर्णधार शुभमन गिलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व के. एल. राहुल करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे या संघात पुनरागमन झाले असून त्यांच्या कामगिरीवर निवड समितीच्या नजरा असतील.

Swapnil S

रांची: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर रांची येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. नियमित कर्णधार शुभमन गिलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व के. एल. राहुल करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे या संघात पुनरागमन झाले असून त्यांच्या कामगिरीवर निवड समितीच्या नजरा असतील. रोहित आणि कोहली आता फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. भारत पुढील दोन महिन्यांत केवळ सहा एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील या दोन महान खेळाडूंसाठी ही मालिका एक प्रकारे परीक्षा असू शकते.

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तो आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. रोहित आणि विराटच्या कामगिरीवर नजरा असतील. मॅथ्यू ब्रीट्झके त्याच्या पहिल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. मधल्या फळीत त्याने ६७.७५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांसारखे दर्जेदार खेळाडू भारताच्या ताफ्यात आहेत. संघ निवडीसाठी भारताकडे बरेच पर्याय आहेत. त्यातील अंतिम ११ खेळाडूंची निवड लवकरच होईल. याबाबत तुम्हाला रविवारी कळेल, असे राहुल म्हणाला. सहाव्या क्रमांकावर राहुलने १० डावांत २४३ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ४२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने ४०.५० च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत.

रांचीतील खेळपट्टीबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर मी अजून ही खेळपट्टी पाहिलेली नाही. पण या खेळपट्टीवरचा एकदिवसीय क्रिकेटमधील इतिहास पाहता

फलंदाजांसाठी अनुकूल अशी विकेट असून चांगल्या धावा अपेक्षित आहेत. येथे दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका दुसऱ्या डावाला बसेल. या सामन्यात डावपेच आखून आम्ही मैदानात उतरू, असे राहुल म्हणाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी जेएससीए स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असल्याने भारताने या मालिकेसाठी संघात बदल केले आहेत. तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांचे पुनरागमन झाले आहे. ऋषभपंत आणि यशस्वी जैस्वाल भारताची फलंदाजी फळी मजबूत करतील. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळलेल्या अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बव्हुमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी केवळ ५९ धावांची आवश्यकता आहे. हा विक्रम करणारा तो २२ वा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरेल.

२००६ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दहा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ मालिका जिंकल्या आहेत.

के.एल. राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार!

भारताचा कर्णधार के. एल. राहुल सहाव्या क्रमांकावरच फलंदाजी करणार असल्याचे त्याने सांगितले. शनिवारी पत्रकार परिषदेत तो बोलत होता. आपण कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल म्हणाला की, याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा झाली आहे. अजून अंतिम ११ खेळाडूंची निवड झालेली नाही. पण मी त्याच स्थानावर फलंदाजी करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. याही सामन्यात मी त्याच जागेवर फलंदाजी करेन, असे तो म्हणाला.

हवामानावर लक्ष

रांची येथे होणारा हा सहावा एकदिवसीय सामना आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त धावा एकदाच झाल्या आहेत. त्या लक्ष्याचा यशस्वीरीत्या बचाव करण्यात आला आहे. तसेच २७० ते २८० धावांचा पाठलाग करण्यातही यश आलेले नाही. रांचीची खेळपट्टी शांत असते. या खेळपट्टीवर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी गोलंदाजीची सुरुवात केली होती. या मैदानावर खेळताना हवामान महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. दव पडण्यावर बरेच काही अवलंबून असेल.

Mumbai : झाडांसाठी नवी एसओपी; चेंबूर दुर्घटनेनंतर २६ वॉर्डांत अधिकारी

ST तील दोषी अधिकाऱ्यांना बढती; सक्षम प्राधिकाऱ्यांचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात

बोईंगच्या मॅक्स विमानांमध्ये सदोष सॉफ्टवेअर; ऑटोमेटेड फ्लाईट गायडन्स सिस्टमवर परिणाम होणार

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

महाराष्ट्राचे नवे केमिकल, पेट्रोकेमिकल धोरण ऑक्टोबरमध्ये; 'असोचेम' च्या शिफारशींवर शिक्कामोर्तब होणार