गॉल : डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने (५५ धावांत ६ बळी) दुसऱ्या डावात मिळवलेल्या सहा बळींच्या जोरावर भारताने श्रीलंकेला ७७.४ षटकांत २०६ धावांत गुंडाळले. त्यामुळे गॉल येथील पहिल्या कसोटीत सामन्यात भारताने श्रीलंकेवर १६५ धावांनी वर्चस्व गाजवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लढतीत एकूण १० बळी मिळवून सुथारने भारताचा ६००वा कसोटी सामना संस्मरणीय केला.
पहिल्या डावात दीडशतक साकारणारा देवदत्त पडिक्कल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याच्या बळावरच भारताने ४६२ धावांपर्यंत मजल मारून श्रीलंकेला पहिल्या डावात २८४ धावांत रोखले. कारकीर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या सुथारने पहिल्या डावात ४ बळी घेतले होते. मग दुसऱ्या डावात भारताने ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे १९३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील १७८ धावांच्या आघाडीमुळे भारताने श्रीलंकेपुढे ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र अपेक्षेप्रमाणे भारतीय फिरकीपटूंपुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. सामनावीर पडिक्कल ठरला असला, तरी बुधवारचा दिवस सुथारने गाजवल्याने त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग ११वा कसोटी सामना जिंकला, हे विशेष.
दरम्यान, २०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या ४४ वर्षीय गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताची कसोटीतील कामगिरी सुमार राहिली आहे. भारताने एकीकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र कसोटीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला मायदेशातच दारुण पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पहिल्या कसोटीद्वारे मात्र गंभीरने काही काळासाठी टीकाकारांना उत्तर दिले आहे.
इंग्लंडविरुद्ध गतवर्षी भारताने शुभमन गिलच्या नेतृत्वात जेमतेम २-२ अशी बरोबरी साधली. आता अनेक अनुभवी खेळाडू निवृत्त झालेले असताना भारतीय संघ २०२७ या वर्षात प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) सामना खेळत होता. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये कसोटी सामना खेळला होता. मात्र ती लढत डब्ल्यूटीसीचा भाग नव्हती. त्यामुळे २०२७च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायचे असल्यास भारताला उर्वरित ८ कसोटींमध्ये कामगिरी उंचवावी लागेल. सध्या भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
तत्पूर्वी, ३७२ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ८४ अशी स्थिती होती. तेथून पुढे बुधवारी खेळताना कर्णधार धनंजय डीसिल्व्हा आणि सोनल दिनुषा यांनी कडवा प्रतिकार केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. डीसिल्व्हाने ७ चौकारांसह, तर दिनुषाने ८ चौकार व १ षटकारासह अर्धशतकाची वेस ओलांडली. अखेर दिवसातील २२व्या षटकात रवींद्र जडेजाने डीसिल्व्हाला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ५९ धावा केल्या. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने निरोशन डिकवेलाला यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. यशस्वी जैस्वालने डिकवेला यास डिवचल्याने त्याचे लक्ष विचलित झाले.
६ बाद १५६ धावांवरून मग दिनुषा आणि केशरा नुवांथा यांनी प्रतिकार केला. दोघांनीही १६ षटके फलंदाजी करतानाच ४३ धावांची भरदेखील घातली. दिनुषा सलग दुसऱ्या शतकाच्या दिशेने कूच करत होता. तसेच जवळपास ७५ षटके झाल्याने भारतीय संघ दुसरा नवा चेंडू घेणार, असेच वाटत होते. वरती काळे ढगदेखील जमा झाले होते. मात्र त्याच वेळी २४ वर्षीय सुथारने आपल्या हाती सूत्रे घेतली. त्याने ७६व्या षटकात सर्वप्रथम दिनुषाचा अडसर दूर केला. मग प्रभात जयसूर्याचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवला. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर लाहिरू कुमाराला बाद करून सुथारने श्रीलंकेची अवस्था ६ बाद १९९ वरून ९ बाद १९९ अशी केली.
अखेरीस ७८व्या षटकात सुथारनेच नुवांथाचा त्रिफळा उडवला व श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांत गुंडाळून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता दुसरी आणि अंतिम कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येईल.
... आणि पावसाला सुरुवात
सामना संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत गॉलमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे भारतीय संघ आणि कर्णधार शुभमन गिल यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मुख्य म्हणजे ७५व्या षटकापर्यंत श्रीलंकेची ६ बाद १९९ अशी स्थिती होती. दिनुषा आपल्या शतकाच्या दिशेने कूच करत होता. तसेच भारतीय संघ दुसरा नवा चेंडू कधी उपलब्ध होणार, याची प्रतीक्षा करत असल्याचे दिसत होते. मात्र सुथारने ७६व्या षटकात दिनुषासह तीन फलंदाजांना माघारी पाठवले. मग त्यानेच ७८व्या षटकात अखेरचा बळी मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तोपर्यंत काळे ढग जमा झाले होते. अखेर काही मिनिटांतच पाऊस सुरू झाला. त्यामुळे सामन्यानंतरचा पुरस्कार वितरण सोहळादेखील बंदिस्त कक्षात पार पडला.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ४६२
श्रीलंका (पहिला डाव) : २८४
भारत (दुसरा डाव) : १९३
श्रीलंका (दुसरा डाव) : ७७.४ षटकांत सर्व बाद २०६ (सोनल दिनुषा ८४, धनंजय डीसिल्व्हा ५९; मानव सुथार ६/५५)
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)