क्रीडा

IND vs PAK T20 World Cup: फिरकी निर्णायक, पाऊस खलनायक? भारताचा आज कोलंबो येथे पाकिस्तानशी मुकाबला; पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील द्वंद्वाची सर्वांना उत्सुकता

रविवारी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर जगभरातील तमाम क्रीडा चाहत्यांना याच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील द्वंद्व पुन्हा पाहायला मिळणार आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे.

Swapnil S

कोलंबो : कित्येक वर्षे उलटली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य अजूनही टिकून आहे. रविवारी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर जगभरातील तमाम क्रीडा चाहत्यांना याच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील द्वंद्व पुन्हा पाहायला मिळणार आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. या लढतीत फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरणार असली, तरी पाऊस खलनायक ठरू शकतो.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. या स्पर्धेत अ-गटात भारत,

पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७मार्चला अंतिम सामना होईल.

दरम्यान, जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताने पहिल्या साखळी सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. मग दुसऱ्या लढतीत त्यांनी नवी दिल्ली येथे नामिबियाला ९३ धावांनी नामोहरम केले. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला होती. सूर्याचीच बॅट फक्त तळपली होती. मात्र नामिबियाविरुद्ध हार्दिक पंड्या, इशान किशन यांनी फटकेबाजी केली. आता पाकिस्तानविरुद्धची लढत जिंकून भारताला अ-गटातील अग्रस्थान कायम राखण्यासह सुपर-८ फेरीतील स्थान पक्के करण्याची संधी आहे.

दुसरीकडे सलमान अघाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्ताननेसुद्धा दोन साखळी सामने जिंकले आहेत. नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी अखेरच्या षटकात सरशी साधली. तर अमेरिकेला मात्र त्यांनी सहज नमवले. पाकिस्तानचा संघ त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळत आहे. त्यामुळे त्यांना तेथील वातावरण व खेळपट्टीची अधिक जाण आहे. हीच बाब त्यांच्यासाठी जमेची ठरू शकते. पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीकची सगळीकडे चर्चा सुरू असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

मात्र या लढतीवर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे यांच्यातील लढत ज्या खेळपट्टीवर झाली, तेथेच भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे १७० ते १८० धावांचा पाठलाग करणे रात्रीच्या वेळेस कठीण जाऊ शकते. श्रीलंकेतील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५च्या सुमारास ७० टक्के पावसाची शक्यता आहे. हा साखळी सामना असल्याने यासाठी राखीव दिवस नाही.

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : सलमान अघा (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, ख्वाजा नफाय, साहिबझादा फरहान, उस्मान खान, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाझ, सय्यम अयूब, शादाब खान, अब्रार अहमद, नसीम शाह, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

१३-३ उभय संघांत १६ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी १३, तर पाकिस्तानने ३ लढती जिंकल्या आहेत. विश्वचषकातही भारताने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत.

वरुणवर मदार, कुलदीप प्रतीक्षेत

भारतासाठी या विश्वचषकात २ सामन्यांत आतापर्यंत सर्वाधिक ४ बळी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने मिळवले आहेत. कोलंबोची खेळपट्टी फिरकीसाठी पोषक असेल, हे सर्वश्रुत आहे. तसेच वरुणकडे कोणत्याही क्षणी लढतीला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो नक्कीच हुकमी एक्का ठरू शकेल. त्याशिवाय चायनामन कुलदीप यादवला भारतीय संघ संधी देणार का, याकडे लक्ष असेल. त्या स्थितीत अर्शदीप सिंगला संघाबाहेर बसावे लागू शकते. जसप्रीत बुमरा भारताच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. अक्षर पटेल व हार्दिक पंड्या गोलंदाजीतही छाप पाडत असल्याने भारताकडे पुरेसे पर्याय आहेत. भारताचे गोलंदाजी विभाग फलंदाजीपेक्षा उत्तम लयीत आहे.

अभिषेक पुनरागमनासाठी सज्ज

भारताचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माची प्रकृती आता स्थिर आहे. त्यामुळे तो रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याचे कर्णधार सूर्यकुमारने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध अभिषेकची बॅट तळपली होती. तसेच पॉवरप्लेमध्ये त्याची व इशान किशनची जोडी घातक ठरू शकते. तिसऱ्या क्रमांकावरील तिलक वर्माकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. सूर्यकुमार, हार्दिक व शिवम दुबे यांच्यात गरजेनुसार फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. रिकू सिंगला मात्र कामगिरी सुधारावी लागणार आहे. रिंकूला विश्रांती देत कुलदीप किंवा वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. अक्षर पटेल फलंदाजीतही योगदान देत असल्याने तो उपयुक्त ठरत आहे.

उस्मानच्या हातावर लक्ष

पाकिस्तानच्या गोलंदाजीची मदार जादुई फिरकीपटू उस्मान तारिकवर असेल. अमेरिकाविरुद्ध त्याने ११व्या षटकानंतर गोलंदाजीस येत २७धावांत ३ बळी मिळवले. चेंडू टाकण्यापूर्वी तो काहीसा थांबत असल्याने फलंदाज चाचपडताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची गोलंदाजी निर्णायक ठरू शकेल. त्याशिवाय अब्रार अहमद, शादाब खान असे फिरकी पर्याय त्यांच्याकडे आहेत. शाहीन आफ्रिदी व नसीम शाहचा वेगवान पर्याय आहे. फलंदाजीत साहिबझादा फरहान फॉर्मात आहे. बाबर आझमनेही लय गवसल्याचे संकेत दिले आहेत. सय्यम अयूब आणि कर्णधार सलमान यांच्या कामगिरीची पाकिस्तानला चिंता असेल. तसेच दडपणात पाकिस्तानचा संघ ढेपाळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

मैदानाबाहेरील वादविवादांचा आढावा

  • भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत यंदा अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामागे असंख्य कारणे आहेत. मैदानासह मैदानाबाहेरील घडामोडींनीदेखील यामध्ये भूमिका बजावली आहे.

  • मे महिन्यात पहलमाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांतील राजकीय संबंध आणखी बिघडले. त्यातच आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतात. भारताचा पुरुष संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईत खेळला. तसेच पाकिस्तानचा संघ आता टी-२० विश्वचषकातील सर्व सामने श्रीलंकेत खेळत आहे.

  • आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात तीन लढती झाल्या. मात्र भारतीय खेळाडूंनी एकदाही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक घेण्यासही नकार दिला होता.

  • आयसीसीला जागतिक स्पर्धेत सर्वाधिक महसूल हा भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मिळतो. मात्र बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतल्यावर पाकिस्ताननेदेखील माघार घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आयसीसीला मध्यस्थी करावी लागली. अखेर पाकिस्तान राजी झाली. बांगलादेशवरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच गेले दोन आठवडे भारत-पाकिस्तान लढतीची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत