क्रीडा

भारताचे फिरकीपटू निष्प्रभ! दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ४८९ धावा; मुथुस्वामी, यान्सेनची छाप

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज विशेषत: फिरकीपटू पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

Swapnil S

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज विशेषत: फिरकीपटू पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यामुळे आफ्रिकेने पहिल्या डावात १५१.१ षटकांत ४८९ धावांचा डोंगर उभारला. शतकवीर सेनुरान मुथुस्वामी (२०६ चेंडूंत १०९ धावा) आणि मार्को यान्सेन (९१ चेंडूंत ९३) यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत मग भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६.१ षटकांत बिनबाद ९ धावा केल्या आहेत. दिवसअखेर यशस्वी जैस्वाल ७, तर के. एल. राहुल २ धावांवर नाबाद असून भारतीय संघ अद्याप ४८० धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे सोमवारी तिसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीकडे लक्ष असेल.

तत्पूर्वी, कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने २६ वर्षीय गिलला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकला असून २८ वर्षीय ऋषभ पंत भारताचा ३८वा कसोटी कर्णधार म्हणून या सामन्यात नेतृत्व करत आहे.

गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.

या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.

आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू असून विशेषत: सायमन हार्मरविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे आता सर्वांचे सोमवारकडे लक्ष लागून आहे.

संक्षिप्त धावफलक

  • दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १५१.१ षटकांत सर्व बाद ४८९ (सेनुरान मुथुस्वामी १०९, मार्को याान्सेन ९३; कुलदीप यादव ४/११५)

  • भारत (पहिला डाव) : ६.१ षटकांत बिनबाद ९ (यशस्वी ७*, राहुल २*)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी