(Photo-X/@airnewsalerts)
क्रीडा

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेच्या फलंदाजांची कोंडी; भारताला पहिल्या डावात १७८ धावांची मोठी आघाडी

युवा मानव सुथार (७६ धावांत ४ बळी) आणि अनुभवी रवींद्र जडेजा (५७ धावांत ३ बळी) या डावखुऱ्या फिरकीपटूंच्या जोडीने सोमवारी श्रीलंकन फलंदाजांची कोंडी केली.

Swapnil S

गॉल : युवा मानव सुथार (७६ धावांत ४ बळी) आणि अनुभवी रवींद्र जडेजा (५७ धावांत ३ बळी) या डावखुऱ्या फिरकीपटूंच्या जोडीने सोमवारी श्रीलंकन फलंदाजांची कोंडी केली. त्यामुळे भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डाव ७९.४ षटकांत २८४ धावांत गुंडाळून तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १७८ धावांची मोठी आघाडी मिळवली. आता चौथ्या दिवशी किमान दोन सत्रे फलंदाजी करून श्रीलंकेसमोर विजयासाठी ३५० ते ४०० धावांचे लक्ष्य ठेवण्यासाठी भारतीय संघ आतुर असेल.

२०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या ४४ वर्षीय गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताची कसोटीतील कामगिरी सुमार राहिली आहे. भारताने एकीकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र कसोटीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला मायदेशातच दारुण पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

इंग्लंडविरुद्ध गतवर्षी भारताने शुभमन गिलच्या नेतृत्वात जेमतेम २-२ अशी बरोबरी साधली. आता अनेक अनुभवी खेळाडू निवृत्त झालेले असताना भारतीय संघ २०२७ या वर्षात प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) सामना खेळत आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये कसोटी सामना खेळला होता. मात्र ती लढत डब्ल्यूटीसीचा भाग नव्हती. त्यामुळे २०२७च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायचे असल्यास भारताला उर्वरित ९ कसोटींमध्ये कामगिरी उंचवावी लागेल.

सोनल दिनुशाचे (१६८ चेंडूंत १०० धावा) शानदार शतक आणि निरोशन डिकवेलाच्या झुंजार अर्धशतकानंतरही श्रीलंकेला ३०० धावांचा पल्ला गाठता आला नाही. भारताने ९ बाद ४६० धावांपासून पुढे खेळताना पहिला डाव ४६२ धावांवर संपवला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. डावाची सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने दुसऱ्याच चेंडूवर दणका देत निशान फर्नांडोला बाद केले. त्यानंतर मानव सुथारने आपल्या फिरकीच्या जोरावर दिनेश चंडिमल, लाहिरू उदारा यांना बाद करत श्रीलंकेची अवस्था ५ बाद ९९ अशी केली. कुलदीप यादव आणि जडेजाने अनुक्रमे कमिंदू मेंडिस व कर्णधार धनंजय डी सिल्व्हाला (२१) बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले.

कठीण परिस्थितीत सोनल दिनुशा (१००) आणि अनुभवी निरोशन डिकवेला (८०) यांनी सहाव्या गड्यासाठी १४६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. दुसऱ्या सत्रात या जोडीने एकही बळी न गमावता ११६ धावा जोडल्या. डिकवेलाला प्रसिद्ध कृष्णाने यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. दिनुशाने १६७ चेंडूंत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले, मात्र पुढच्याच चेंडूवर जाडेजाने त्याला पायचित केले. भारताकडून मानव सुथारने ७६ धावांत ४ बळी घेतले, तर रविंद्र जाडेजाने ५७ धावांत ३ बळी मिळवले.

आता भारतीय फलंदाजांवर चौथ्या दिवशी सर्वांचे लक्ष लागून असेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता